तिबेटीयनांची दुर्गा चौकातून निघाली रॅली
By Admin | Updated: March 13, 2017 00:27 IST2017-03-13T00:27:08+5:302017-03-13T00:27:08+5:30
तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा तसेच तिबेटमधील सर्व धर्मगुरुंना दीर्घायुष्य लाभो तसेच तिबेट लवकर स्वतंत्र होऊन

तिबेटीयनांची दुर्गा चौकातून निघाली रॅली
शांतीमय वातावरणात दीपमार्च : तिबेटी क्रांतिदिनी तहसीलदारांना निवेदन
अर्जुनी-मोरगाव : तिबेटचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा तसेच तिबेटमधील सर्व धर्मगुरुंना दीर्घायुष्य लाभो तसेच तिबेट लवकर स्वतंत्र होऊन तेथील रहिवासी व निर्वासित तिबेटीयनांचे मिलन व्हावे, या अपेक्षेने शुक्रवारी सायंकाळी ५८ व्या तिबेटी क्रांती दिवसप्रसंगी रिजनल तिबेटीयन युथ काँग्रेस व नोरग्यालिंग तिबेटीयन वसाहत प्रतापगडच्या वतीने शांततापूर्ण वातावरणात दीपमार्च काढण्यात आला.
शांतात रॅली स्थानिक दुर्गा चौकातून निघाली. प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभेत रुपांतर झाले. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या मार्चचे नेतृत्व युथ काँग्रेसचे अध्यक्ष लोपसंग त्सेरिंग, सचिव कर्मा थामजोय, पेन लोपसंग तेन्पा, तेनजीन पासंग, लाम्हो त्सेरींग, गुरमेटी दंचेन, तेनजीन संग्याल यांनी केले.
१० मार्च १९५९ रोजी तिबेटच्या तिन्ही प्रांतातील लाखो तिबेटीयनांनी राजधानी ल्हासा येथे एकत्रीत येऊन जनआंदोलनाच्या रुपात लामाचे दीर्घायुष्य, तिबेटचे स्वातंत्र्य व चीनची हकालपट्टी यावर घोषणा करून चिनचा विरोध केला. या ऐतिहासीक दिनी सर्वच निर्वासित वसाहतीत दीपमार्च काढला जातो.
आपल्या स्वार्थासाठी तिबेटला पर्यटन केंद्राच्या रुपात चीनद्वारे विकसीत करण्याचा प्रयत्न होत आहे. चीन सरकार तिबेटीयन जाती, भाषा व संस्कृतीला समूळ नष्ट करण्यासाठी क्रूर धोरणांचा अवलंब करीत आहे. तिबेटध्ये श्रध्देय असलेले लामा यांच्याप्रती सन्मान व्यक्त करणाऱ्या श्रध्दाळूंना मौलीक अधिकारांचे हननच नव्हे तर बळजबरीने पकडून अटक करण्याची दहशत आहे.
तिबेटमध्ये संस्कृतीनुरुप अवतार ओळखण्याची व्यवस्था आहे. चौदावे दलाई लामा यांच्या पुनर्जन्म निवडीचे अधिकार चीन आपले अधिकार असल्याचे मानत आहे, याचा विरोध केला जात आहे. शांततापूर्ण आंदोलनकाऱ्यांना चीन क्रूर व दहशतयुक्त धोरणाने आत्मदहन करण्यासाठी प्रवृत्त करीत आहे.
या सर्व घटनांचा विरोध तिबेटीयनांनी दर्शविला. जोपर्यंत तिबेटवर चीनचे अधिपत्य राहील तोवर हा संघर्ष सुरूच असेल, असे तिबेटी युवक काँग्रेसने आवाहन केले. (तालुका प्रतिनिधी)