शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: November 24, 2014 22:59 IST2014-11-24T22:59:35+5:302014-11-24T22:59:35+5:30
धान खरेदी करताना शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर शेतमालाची मोजणी व्हावी यासाठी शिवसेना तालुका अर्जुनी/मोरगावतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा
अर्जुनी/मोरगाव : धान खरेदी करताना शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर शेतमालाची मोजणी व्हावी यासाठी शिवसेना तालुका अर्जुनी/मोरगावतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. येत्या दोन दिवसात इलेक्ट्रॉनिक्स वजनकाट्याने मोजणी करण्यासंदर्भात कारवाई करण्यात येणार, असे आश्वासन तहसीलदार संतोष महाले यांनी दिले.
तालुक्यात शासकीय आधारभूत हमी भाव खरेदी केंद्र सुरू झाले. अनेक केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांचा गतवर्षी पुरवठा करण्यात आला. मात्र अनेक धान खरेदी केंद्रांवर जुन्याच वजनकाट्यावर शेतमालाची मोजणी सुरू होती. जुन्या वजनकाट्यांवर मोजणी होत असल्याने धान खरेदी केंद्राना प्रत्येक ५० किलोमागे सुमारे ५ किलो अधिकचे धान मिळत होते. शेतकऱ्यांची ही होणारी लूट थांबविण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेऊन १५ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन ८ दिवसात सर्वच केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याने मोजमाप प्रक्रिया सुरु करण्याची मुदत दिली होती.
या मुदतीत कार्यवाही झाली नाही यासाठी सोमवारला (२४) शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला.
शिवसेना कार्यकर्त्यानी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात सुरू असलेल्या धान खरेदी केंद्रावर भेट दिली. त्यावेळी त्यांना जुन्या वजनकाट्यावर २ किलो वजन अतिरीक्त आढळून आले. खरेदी केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्याने हे पासंग असल्याचे सांगितले. साध्या काट्यावर मोजणी केलेल्या ५० किलो वजनाच्या पोत्याचे इलेक्ट्रॉनिक काट्यावर ५५ किलो वजन आढळून आले. या पध्दतीने ५० किलोवर शेतकऱ्यांची ५ किलो लूट केली जात असल्याचा आरोप करून या केंद्रावरील कर्मचाऱ्यांवरगुन्हा नोंदविण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. याच केंद्रावर सुरू असलेला जुना वजनकाटा काढून इलेक्ट्रॉनिक वजनकाटा बसविण्यास शिवसैनिकांनी भाग पाडले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शिवहरे, जि.प. सदस्य किरण कांबळे, जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल, तालुका प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख अजय पालीवाल, अरूण मांडगवणे, लैलेश शिवणकर, विजय खुणे, बबन बडवाईक, यादव कुंभरे, सुरेश ठवरे, गजानन शेंडे, प्रकाश उईके, धर्मा शेंडे, गोवर्धन राखडे, अजय पशीने, रवी देशमुख, कमल सयाम, रमेश वाघाडे, दयाराम रहेले, अशोक सयाम, चंद्रकला सोनवाने, कैलाश चुन्ने, विलास वट्टी, अनिल बनकर व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)