पाच महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 06:00 IST2019-09-30T06:00:00+5:302019-09-30T06:00:11+5:30
अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका गोरेगाव तालुक्याला बसला असून या तालुक्यात ११८ घरे आणि २७ गोठ्यांची पडझड झाली. धानपिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुजारीटोला ४ चे तर कालीसरार धरणाचे २ दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले. मागील सात आठ दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली.

पाच महसूल मंडळात अतिवृष्टी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात शनिवारी दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तीन तालुक्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका गोरेगाव तालुक्याला बसला असून या तालुक्यात ११८ घरे आणि २७ गोठ्यांची पडझड झाली. धानपिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुजारीटोला ४ चे तर कालीसरार धरणाचे २ दरवाजे रविवारी सकाळी उघडण्यात आले.
मागील सात आठ दिवसांपासून उघडीप घेतलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. आमगाव, गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील काही गावांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. त्यामुळे या तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून मागील चौवीस तासात १०५९.मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव ११४ मि.मी, कुºहाडी महसूल मंडळात ८३.२० मि.मी.पावसाची नोंद झाली. तर आमगाव तालुक्यातील आमगाव ७८.८० आणि ठाणा महसूल मंडळात ९०.३० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तिरोडा तालुक्यातील एकमेव वडेगाव महसूल मंडळात ६८.८० मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद गोरेगाव तालुक्यात झाली असून पावसामुळे ११८ घरे आणि २७ गोठ्यांची पडझड झाली आहे.पावसामुळे धानपिक झोपल्याने पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसामुळे या तालुक्यावर ओला दुष्काळासारखी स्थिती आहे.रविवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे धान पिकांवरील किडरोगांमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.
पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रविवारी सकाळी पुजारीटोला धरणाचे ४ तर कालीसरार धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.त्यामुळे वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठालगतच्या गावातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
धानपिकाला सर्वाधिक फटका
सध्या धान पिक भरण्याच्या स्थितीत असून आता पावसाची गरज आहे. मात्र शनिवारी झालेल्या जोरदार पावसाचा फटका धानपिकाला बसला. पाऊस आणि वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात धान बांध्यामध्ये झोपून गेले. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
अनेक भागाचा विद्युत पुरवठा खंडीत
शनिवारी दुपारपासून पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे गोंदिया शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा रात्रभर खंडीत होता. त्यामुळे अनेकांना मच्छरांच्या सानिध्यात रात्र जागून काढावी लागली. तर शहरातील काही भागात झाडांची सुध्दा पडझड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.
नुकसानीचे सर्वेक्षण सुरू
अतिवृष्टीमुळे आमगाव, तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यात घरे आणि गोठ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. तर पिकांचे सुध्दा नुकसान झाले.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महसूल आणि कृषी विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली आहे.