गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस
By Admin | Updated: September 19, 2015 02:46 IST2015-09-19T02:46:10+5:302015-09-19T02:46:10+5:30
पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाचे आणि यावर्षी बऱ्यात अंतराअंतराने हजेरी लावत असलेल्या पावसाने सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता....

गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस
तीन दिवसात बॅकलॉग भरला : आतापर्यंत ८१.६ टक्के, मागील वर्षी होता ७४.६ टक्के
गोंदिया : पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाचे आणि यावर्षी बऱ्यात अंतराअंतराने हजेरी लावत असलेल्या पावसाने सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता. मात्र १५, १६ व १७ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसाने बॅकलॉग भरून काढत गेल्यावर्षीची सरासरी पार केली. मागील वर्षी जिल्ह्यात १८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९४०.१ मिमी (७४.६ टक्के) पाऊस झाला होता. यंदा १०२८.३ मिमी (८१.६ टक्के) पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.
पावसाच्या अभावाने काही ठिकाणी धानपीक वाळण्याच्या मार्गावर होते. दमट वातावरणामुळे पिकांवर अनेक रोग पसरले होते. परंतु तीन दिवसाच्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले. त्यातच गादमाशी व खोडकिड्यांच्या प्रादुर्भाव कमी झाला. आता आणखी १० ते १२ दिवस पाऊस पडला नाही तरी पिकांवर विपरित परिणाम होणार नाही, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.
सदर तीन दिवसांत आलेल्या पावसाचा लाभ सर्व प्रकारच्या पिकांना झाला आहे. मागील वर्षी ज्या-ज्या वेळी पाण्याची पिकांना गरज होती, त्या-त्या वेळी पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न झाले होते. यंदा आतापर्यंतची स्थिती पाहता पाऊस पडण्याच्या काळात मोठा कालखंड दिसून येत आहे. सतत दोन दिवस पाऊस आल्यानंतर १५ ते २० दिवसपर्यंत पाऊस पडत नाही. पिकांना गरजेच्या वेळीच पाणी मिळत नसल्याने उत्पन्नात घटसुद्धा होवू शकते.
यंदाच्या पावसाने मागील वर्षाची सरासरी ओलांडली असली तरी गॅप मोठी असल्याने शेतकरी वर्ग काहिसा चिंतीत दिसून येत आहे. (प्रतिनिधी)