पाऊस व वादळाने झोडपले
By Admin | Updated: June 3, 2015 01:11 IST2015-06-03T01:11:15+5:302015-06-03T01:11:15+5:30
तालुक्यात ३१ मे रोजी ४६ डिग्री सेल्सिअस तापमान भिषण गर्मीची दाहक होती. अशातच रात्री ११.३० वाजता निसर्गाने आपले रंग बदलविले.

पाऊस व वादळाने झोडपले
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात ३१ मे रोजी ४६ डिग्री सेल्सिअस तापमान भिषण गर्मीची दाहक होती. अशातच रात्री ११.३० वाजता निसर्गाने आपले रंग बदलविले. प्रचंड विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने व वादळाने थैमान घातले. या वादळी पावसात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात शेकडो वृक्षासह शेकडो घरे अंशत: पडली असून महसूल विभागाच्या वतीने पंचनामे सुरू आहेत. गेल्या ६० ते ७० वर्षाच्या काळातही एवढा विजांचा कडकडाट कुणी ऐकल्याचे सांगत नाही. या कडकडामुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले होते. यात जिवीतहाणी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे निदर्शनास येत आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३१ मे ची रात्र सदैव आठवणीत राहील असा प्रचंड विजेचा कडकडाट लोकांनी पहिल्यांदाच अनुभवला. या वादळी पावसात तालुक्यातील रबीचे पिकांचे व फळभाजी पिकांचे लाखोचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कुंभीटोला येथील प्रगतशील शेतकरी विजयसिंह राठोड यांचे शेतातील १७ केळीची बाग या वादळामुळे पूर्णत: उध्वस्त झाली. ऐन केळी लागण्याच्या उंबरठ्यावर असतांना या वादळाने केळीचे झाडे उन्मळून पडली. त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे दोन लाखाचे जवळपास नुकसान झाले आहे. बोंडगावदेवी येथील कुशन झोळे, विहीरगाव येथील विश्वनाथ वालदे यांनी आपल्या शेतात तयार केलेले शेडनेट खांबासह उडाल्याने दोघाही शेतकऱ्यांचे दिड लाख रूपये प्रत्येकी असे तिन लाखाचे नुकसान झाले. शेडनेट मध्ये असणारी कारले पिक पूर्णत: उध्दवस्त झाले. मागील वर्षीसुध्दा याच शेतकऱ्यांचे गारपिटीने लाखो रुपयाचे टरबूज पिक नेस्तनाबूत झाले. या वादळात तालुक्यातील अनेक गावात शेकडो वृक्ष कोसळले. अर्जुनी-मोरगाव मंडळात देवलगाव ३ घरे, बाराभाटी ५ घरे, मोरगाव ३० घरे, अर्जुनी-मोरगाव ४० घरे, निमगाव ३० घरे, धाबेटेकडी १० घरे अंशत: पडली आहेत. ३ लाख ३ लाख २७ हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पूर्ण गावातील पंचनामे मंगळवारी दुपारी २ वाजतापर्यंत तहसील कार्यालयाला येण्यास असल्याने नुकसानीचा आकडा बरोबर मिळू शकला नाही. मात्र संपूर्ण तालुक्यातच शेकडो घरे पडल्याची माहिती आहे. चान्ना/बाक्टी येथे जगन रेवतीराम लोगडे यांचे घरावर विज पडल्याने घरातील सामानाचे बरेच नुकसान झाले आहे. ६० ते ७० हजाराचे नुकसान प्राथमिक अंदाज आहे. अर्जुनी-मोरगाव शहरात लघु व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचे दुकाने वादळाने उडवून नेली. यात हजारोचे नुकसान झाले आहे. अर्जुनी-मोरगाव येथे रामदेव राईस मिल तथा श्रीकृष्ण राईस मिलच्या गोदामातील टीन उडाल्याने लाखो रुपयाच्या तांदळावर पाणी गेल्याने तांदूळ खराब झाले आहे. या वादळामुळे रात्री १२ वाजतापासूनच विज पुरवठा खंडीत झाला आहे. अवकाळी पाऊस व प्रचंड वादळी पावसाने अक्षरश: अर्जुनी-मोरगाव तालुक्याला झोडपून काढले. (तालुका प्रतिनिधी)