रेल्वेस्थानक, की खुले मदिरालय!
By Admin | Updated: January 12, 2015 22:51 IST2015-01-12T22:51:14+5:302015-01-12T22:51:14+5:30
दक्षिण-पूर्ण-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूरपर्यंतच्या मार्गावरील सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वेस्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. त्यामुळेच येथे विविध प्रकारच्या सोयीसुविधा

रेल्वेस्थानक, की खुले मदिरालय!
देवानंद शहारे- गोंदिया
दक्षिण-पूर्ण-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूरपर्यंतच्या मार्गावरील सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वेस्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. त्यामुळेच येथे विविध प्रकारच्या सोयीसुविधा वाढविल्या जात आहेत. दररोज जवळपास ४० हजार प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या स्थानकात रात्रीच्या वेळी मात्र वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. गाडीच्या प्रतीक्षेत अनेक प्रवासी स्थानकाच्या आवारात मद्यप्राशन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आला.
या प्रकाराने गोंदियाचे रेल्वेस्थानक खुले मदिरालय झाल्याचा भास होतो. मात्र या गंभीर प्रकाराबाबत रेल्वे पोलीस मात्र ‘अनभिज्ञता’ दर्शवित आपल्या कर्तव्यतत्परतेचा परिचय देत आहेत.
गोंदिया स्थानकावर दररोज सरासरी २० हजार प्रवासी उतरतात आणि तेवढेच चढतात. मात्र काही प्रवासी विलंबाने धावणाऱ्या आपल्या गाडीच्या प्रतीक्षेत येथील ‘होम प्लॅटफार्म’वर सायंकाळी मदिराप्राशनाचा कार्यक्रम उरकून घेतात. या कार्यक्रमानंतर बियर, देशी-विदेशी दारूच्या बाटल्या फलाटावरील भिंतीला लागूनच टाकल्या जातात. कमी पैशात वेळेचा सदुपयोग (?) करण्याचा हा प्रकार रेल्वेच्या नियमांची ऐसीतैसी करणारा आहे. मात्र सर्रासपणे होणाऱ्या या गैरप्रकाराकडे रेल्वे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. अशा मद्यपींमुळे अनेक वेळा महिलांना असुरक्षित वाटायला लागते. यातूनच एखाद्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोंदिया रेल्वे स्थानकावरून पूर्वेकडे बिलासपूर, पश्चिमेकडे नागपूर, उत्तरेकडे बालाघाट तर दक्षिणेकडे चंद्रपूर या चारही दिशांनी रेल्वे प्रवास होतो. येथील होम प्लॅटफार्मच्या शेजारी लगेज किंवा पार्सलची ने-आण करण्यासाठी अप्सरा बियर बार शेजारी एक नवीन प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. हे गेट केवळ साहित्यांची ने-आण करतानाच सुरू असते. मात्र या गेटला लागूनच एक लहान गेट असून ते नेहमी सुरू असते. या गेटचा उपयोग प्रवासी ‘शॉर्टकट’ म्हणून वापरून रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी करतात. सायंकाळच्या सुमारास नेमक्या याच लहान गेटपासून बियरच्या बाटल्या व दारूच्या रिकाम्या पव्व्यांची रांग लागते.
या लहान गेट शेजारीच मद्यपान होत असल्यामुळे महिला प्रवाशांना मोठाच त्रास होतो. काही महिला सायंकाळनंतर येथून जाण्यास धजावत नाही. काही मद्यपी मद्यपानानंतर या गेटच्या जवळच नशेत धुंद होवून पडून राहतात.
अशावेळी त्यांना ओलांडून जाणे म्हणजे नाक दाबून तारेवरची कसरतच ठरते. काही वेळा गाडी आणखी लेट झाली तर एखाद्याला पाठवून दारू मागविली जाते आणि ‘जाम पे जाम’ चढविले जातात.