बंद दिव्यांसाठी दिला रेल्वेला झटका

By Admin | Updated: October 27, 2016 00:21 IST2016-10-27T00:21:00+5:302016-10-27T00:21:00+5:30

रेल्वेने प्रवास करताना बोगीतील दिवे जळत नसल्याने प्रवाशांना अंधारात प्रवास करावा लागला.

Railway jolt given for closed lights | बंद दिव्यांसाठी दिला रेल्वेला झटका

बंद दिव्यांसाठी दिला रेल्वेला झटका

सात हजारांचा दंड : ग्राहक तक्रार निवारण मंचचे आदेश
गोंदिया : रेल्वेने प्रवास करताना बोगीतील दिवे जळत नसल्याने प्रवाशांना अंधारात प्रवास करावा लागला. हा प्रकार रेल्वेच्या अंगलट आला असून ग्राहक तक्रार निवारण मंचने प्रकरणी रेल्वेला सात हजार रूपयांचा दंड सुनावला आहे. गोंदिया ग्राहक मंचने याबाबत आदेश दिला आहे.
सविस्तर असे की, येथील रहिवासी हिम्मत राठोड त्यांचे जावई गोपाल चव्हाण व मुलगी मीना चव्हाण यांच्यासोबत १८ जानेवारी २०१५ रोजी बालाघाट येथून जबलपूर जाण्यासाठी सतपुडा एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. प्रथम श्रेणीत त्यांचे आरक्षण होते व सायंकाळी येणाऱ्या शिकारा स्टेशनवर तक्रारकर्ता राठोड यांनी दिवे लावण्याचा प्रयत्न केला मात्र बोगीतील दिवे लागले नाही. परिणामी त्यांना बरगी स्टेशन पर्यंत आपल्या परिवारजनांसोबत अंधारात प्रवास करावा लागला.
बरगी स्टेशनवर स्टेशन मास्टरला तक्रार केली असता त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्याच्या मदतीने बोगीतील दिवे सुरू केले. यावर मात्र राठोड यांच्या मुलीने झालेल्या त्रासाबद्दल त्यांचा दिवशी लेखी तक्रार नोंदविली. तर राठोड यांनी प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. मात्र प्रकरणी रेल्वेकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राठोड यांचे पुत्र सुधीर राठोड यांनी माहिती अधिकारातून तक्रारी संबंधात केलेल्या कारवाई बाबत माहिती मागीतली. मात्र रेल्वने १० मार्च च्या पत्रात चुक स्वीकारत भविष्यात चुक होणार नसल्याचे आश्वासन दिले.
मात्र काहीच योग्य कारवाई न झाल्याने राठोड यांनी १९ नोव्हेंबर रोजी ग्राहक मंचात तक्रार नोंदविली. यात दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकत मंचचे अध्यक्ष एम.जी.चिलबुले व सदस्य एच.एम.पटेरिया यांनी २१ आॅक्टोबर रोजी निर्णय सुनावला. यात त्यांनी रेल्वेला प्रवाशांना झालेल्या असुविधा व मासनिक त्रासासाठी पाच हजार रूपये व खर्चापोटी दोन हजार रूपयांचा असा एकूण सात हजार रूपयांचा दंड सुनावला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Railway jolt given for closed lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.