लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मालगाडीला लागून असलेले रेल्वे इंजिन कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे अचानक डब्यांपासून वेगळे होऊन विनालोकोपायलट ३ किमीपर्यंत धावल्याचा आश्चर्यकारक प्रकार गोंदिया-बालाघाट रेल्वमार्गावरील बिरसोला ते गात्रा रेल्वेस्थानक दरम्यान मंगळवारी (दि. २१) सकाळच्या सुमारास घडला. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती आहे.बालाघाटकडून गोंदियाकडे येणारी मालगाडी मंगळवारी (दि. २१) सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिरसोला रेल्वेस्थानक ओलांडल्यानंतर बिरसोला ते गात्रा रेल्वेस्थानकाच्या मध्यभागी पोल क्रमांक १०१४-१ जवळ आली. येथे येताच या मालगाडीच्या मागील भागात लागलेले रेल्वेचे इंजिन क्रमांक डब्ल्यू एजे ९ एचसी ३२९७७ अचानक डब्यापासून वेगळे झाले व परत बिरसोलाच्या दिशेने जाऊ लागले. यावेळी कर्तव्यावर असलेल्या सहायक लोकोपायलटने इंजिनला थांबविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची माहिती लोकोपायलटतर्फे बिरसोला रेल्वेस्थानकातील स्टेशन मास्टरला देण्यात आली. यावेळी बिरसोलाच्या स्टेशन मास्टरांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्वरित या मार्गावरील सर्व रेल्वेफाटक बंद करण्याचे आदेश दिले. तर इंजिनला थांबविण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. यावेळी बिरसोला लाईन क्रमांक ३ वर पोर्टर ललन यादव, सुशांत डहाट व एसएनटी पथकासह परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने इंजिनला सुरक्षित थांबविण्यात आले. बिरसोला स्थानकावरील कर्मचारी व नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठा अपघात टळला. मात्र, या प्रकाराने नागरिकांमध्ये चांगलीच घडकी भरली होती. दरम्यान, या प्रकारामुळे या मार्गावर धावणारी समनापुर-गोंदिया पैसेंजर रेल्वेगाडी २ तास उशिरा धावली. त्यामुळे या रेल्वेगाडीतील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.