लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेल्वे प्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांना पारंपरिक खाद्यान्नांसह आधुनिक भोजन रेल्वे परिसरात उपलब्ध व्हावे, यासाठी रेल्वेने रेल्वे कोच रेस्टॉरंट उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत गोंदियात देखील या रेस्टॉरंटचे काम प्रगतिपथावर असून, हे रेस्टॉरंट लवकरच साकारणार आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेद्वारे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना आल्हाददायक, आकर्षक रूपात चोवीस तास गुणवत्तापूर्ण भोजनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रेल्वे कोच रेस्टॉरंट हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रवासी व नागरिकांना पारंपरिक खानपान व्यवस्थेसह आधुनिक अनुभव प्रदान करण्यात येणार आहे. या रेस्टॉरंट उभारणीसाठी रेल्वेच्या जुन्या कोचचा वापर करण्यात येत आहे. सद्यस्थितीत बिलासपूर व इतवारी येथील सुभाषचंद्र बोस रेल्वेस्थानकावर हे रेस्टॉरंट सुरू असून, त्याला प्रवासी व नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या रेस्टॉरंट विस्तारीकरणाचे काम सुरू असून, या श्रृंखलेत आता नागपूर मंडळातील गोंदिया व छिंदवाडा आणि बिलासपूर मंडळातील उसनापूर रेल्वेस्थानक जोडण्यात आले आहे. या तीनही रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे कोच रेस्टॉरंटचे काम प्रगतिपथावर असून, लवकरच प्रवासी व सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
"रेल्वे प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी रेल्वे सतत प्रयत्नशील आहे. रेल्वे कोच रेस्टॉरंट हा या दिशेतील एक अभिनव व उपयोगी पाऊल आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना दर्जेदार दर्जेदार खाद्यान्न मिळणार असून, आगामी काळात या प्रमुख रेल्वेस्थानकावर रेल्वे कोच रेस्टॉरंट निर्मितीची योजना आहे."- दिलीप सिंह, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक