रेल्वे व बसगाड्या हाऊसफुल्ल
By Admin | Updated: November 13, 2015 01:46 IST2015-11-13T01:46:37+5:302015-11-13T01:46:37+5:30
दिवाळी म्हटले की सुट्या. प्रत्येक घरातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दिवाळीच्या सुट्या पाहूनच अनेक कुटुंबात पर्यटनाला जाण्याचा,

रेल्वे व बसगाड्या हाऊसफुल्ल
दिवाळीची लगबग : प्रवाशांची होतेय गैरसोय
गोंदिया : दिवाळी म्हटले की सुट्या. प्रत्येक घरातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दिवाळीच्या सुट्या पाहूनच अनेक कुटुंबात पर्यटनाला जाण्याचा, दुसऱ्या गावी पाहुणे म्हणून जाण्याचा बेत आखतात. त्यामुळे सध्या रेल्वे व बसगाड्यांमध्ये प्रवाशांची अलोट गर्दी दिसून येत आहे. यामुळे रेल्वे व एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार असली तरी प्रवाशांची गैरसोय होत आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यात अनेक जण सहकुटुंब बाहेरगावी नातलगांकडे जातात. लक्ष्मीपूजन आटोपताच घरोघरी मामाच्या गावाला जायची घाई असते. अशातच रेल्वे व बस स्थानकाच्या फलाटांवर सर्वत्र गर्दी दिसून येते. गोंदिया रेल्वे स्थानकावरून बालाघाट, छत्तीसगड, चंद्रपूर व नागपूरच्या दिशेने रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाच्या सर्वच फलाटांवर लोकांची एकच गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वेगाडीत चढताना व उतरताना प्रवाशांना मोठीच कसरत करावी लागत आहे. प्रसंगी पॉकिटमारांची भीतीसुद्धा असते.
अशीच गत बस स्थानकांच्या फलाटावरही दिसून येत आहे. बसमध्ये जागा न मिळाल्यास काही प्रवासी काळी-पिवळी गाडीचा आधार घेवून आपल्या नजीकपासच्या गावाचा प्रवास करतात. त्यातच काळीपिवळी गाडीमध्ये प्रवाशांना जनावरांप्रमाणे कोंबले जाते. त्यामुळे काही नागरिक बस किंवा रेल्वेच्या प्रवासालाच प्राधान्य देताना दिसतात. गोंदिया व तिरोडा आगारातील काही बसफेऱ्या वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यास बरीच मदत मिळणार आहे.
दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात लग्न समारंभसुद्धा असतात. या समारंभांना जाण्यासाठी प्रवाशी बस स्थानकांवर एकच गर्दी करतात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला निश्चितच नफा होणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या गोंदियाच्या रेल्वे स्थानकावरील सर्वच प्लॅटफॉर्मवर गर्दीचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे तिकीट चेकींग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)