रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल
By Admin | Updated: November 3, 2014 23:29 IST2014-11-03T23:29:00+5:302014-11-03T23:29:00+5:30
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊ न रेल्वेगाड्यातील टीसींनी पैसे कमविण्याचा नवीन फंडा काढला आहे. ५० रुपये द्या आणि द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करा, असे त्यांचे ब्रीदवाक्य आहे

रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल
गोंदिया : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊ न रेल्वेगाड्यातील टीसींनी पैसे कमविण्याचा नवीन फंडा काढला आहे. ५० रुपये द्या आणि द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करा, असे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असून, कधी- कधी प्रवाशांना १०० रुपयेसुध्दा द्यावे लागतात.
सणांमुळे प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वेगाडया हाउसफुल्ल आहेत. दोन महिन्यांपासून काही गाड्यांचे आरक्षण मिळणेही कठीण झाले आहे. साधारण श्रेणीच्या डब्यांत नेहमीच पाय ठेवण्यासाठी जागा मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून, नाईलाजास्तव द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करावा लागत आहे. टीसीकडून सर्रास वसुली केली जात आहे.
साधारण श्रेणीची तिकीट असताना द्वितीय श्रेणीच्या डब्यात सापडल्यास प्रतिव्यक्ती ५० रुपये घेऊ न कारवाई न करता सोडले जात आहे. यातून दररोज हजारो रूपयांचा गोरखधंदा सुरू असून, याकडे रेल्वे प्रशासनातील वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने ५० रू पये द्या अन् द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करा, हा नारा सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर असलेल्या नागपूर, भंडारा, गोंदिया, तुमसर येथे नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कर्मचारी असल्याने मासिक पास काढून रेल्वेने प्रवास करीत आहेत. मात्र, सणामुळे रेल्वेगाड्या हाउसफुल्ल असल्याने दररोज प्रवास करणाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. काही जणांनी टीसींशी मधुर संबंध प्रस्थापित करू न आपली सोय करू न घेतली असून, साधारण श्रेणीची मासिक पास असताना नियमांची पायमल्ली करू न द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास केला जात आहे. हीच संधी साधून काही टीसींनी कारवाईची मोहीम उघडली आहे.
जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा देण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे बोर्डाच्या दुर्लक्षितपणामुळे प्रवाशांना अनेक अचडणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सणामुळे रेल्वेगाड्या प्रवाशांनी हाउसफुल्ल आहेत. एसटी बसेस तसेच खासगी वाहनांमध्येही गर्दी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तुमसर रोड जंक्शन रेल्वेस्थानक प्रवाशांना फुलून दिसत आहे.
सण महत्त्वाचा समजला जात असल्याने मजुरी करणारे, व्यापारी, नोकरी करणारे आपल्या गावाकडे जात असतात. रेल्वेचे भाडे कमी असल्याने सामान्य प्रवाशांचा कल रेल्वेकडे असतो. यामुळेच सध्ये रेल्वे गाड्या प्रवाशांनी खचाखच भरून चालत आहेत. एवढेच नव्हे तर गाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याचे दिसून येत आहे. नेमकी हीच संधी साधून टीटींचे चांगलेच फावत आहे. ज्या प्रवाशांना गर्दीत प्रवास करता येत नाही ते आरक्षीत डब्यात जाऊन बसत असून त्यांच्याकडून टीटी पैसे घेऊन प्रवासाची सुट देत आहेत.
दिवाळीच्या गर्दीने हा प्रकार चांगलाच जोमात सुरू आहे. दिवाळीच्या सुट्या संपत आल्या असून दिवाळीनिमित्त बाहेरगावी निघालेले आपापल्या घरी परत जात आहेत. यामुळेच आरक्षण मिळत नसल्याने टीटीच्या हातात पैसे देऊन आपला प्रवास ते पूर्ण करीत असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)