मेडिकलमध्ये रेबीज इंजेक्शनचा तुडवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:17+5:30
गोंदिया तालुक्यातील सेजगाव खुर्द येथील रहिवासी यश अमृत बिसेन (२७), किसनलाल दयाराम कावडे ़(५५), कीर्ती पटले (५५), अरुण किर्ती पटले (२२) या चार जणांना गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एका पागल कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे त्यांना सुरूवातीला भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

मेडिकलमध्ये रेबीज इंजेक्शनचा तुडवडा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील सेजगाव खुर्द येथील चार जणांना पागल कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे या चारही जणांना गुरूवारी (दि.२६) रात्री येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) दाखल करण्यात आले. मात्र येथे रेबीज इंजेक्शन नसल्याने या चारही जणांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. मेडिकल सुरू होऊन चार वर्षांचा कालावधी लोटूनही येथे आरोग्य विषयक सोयी सुविधांचा अभाव असून साध्या रेबीजच्या इंजेक्शनसाठी रुग्णांना नागपूरपर्यंत पायपीट करावी लागत आहे.
गोंदिया तालुक्यातील सेजगाव खुर्द येथील रहिवासी यश अमृत बिसेन (२७), किसनलाल दयाराम कावडे ़(५५), कीर्ती पटले (५५), अरुण किर्ती पटले (२२) या चार जणांना गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास एका पागल कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे त्यांना सुरूवातीला भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करुन गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. या चारही रुग्णांना रेबीज ह्यूमन मोनीक्लोज एंटीबॉडी हे इंजेक्शन देण्याची गरज होती. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने या चारही जणांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. विशेष म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेबीज इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी शहरातील मेडिकलमधून हे इंजेक्शन खरेदी करुन आणले. हा प्रकार नेहमीचाच असल्याचे रुग्णांनी सांगितले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नेहमीच विविध कारणासाठी चर्चेत असते. साधे रेबीज इंजेक्शन एवढ्या मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना नागपूरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयाचा नेमका उपयोग काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शासनाकडून पुरवठाच नाही
कुत्रा चावल्यानंतर दिले जाणाऱ्या रेबीज इंजेक्शनचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुरवठाच होत नाही.त्यामुळे हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे कारण येथील डॉक्टरांनी सांगितले. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुरवठा करण्यात आलेल्या औषधांचे २ कोटी ८९ लाख रुपयांचे बिल थकीत असल्याने औषधांचा पुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी शासनाकडून निधी केव्हा मिळणार हे रुग्णालय प्रशासनाला सुध्दा माहिती नाही.