अव्यवस्थांवर त्वरित अंकुश लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 01:57 IST2017-04-28T01:57:17+5:302017-04-28T01:57:17+5:30
येथील केटीएस रूग्णालयातील अव्यवस्थांना बघता आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.२५)

अव्यवस्थांवर त्वरित अंकुश लावा
गोपालदास अग्रवाल : केटीएस रूग्णालयाची केली पाहणी
गोंदिया : येथील केटीएस रूग्णालयातील अव्यवस्थांना बघता आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.२५) केटीएस रूग्णालयाची पाहणी करीत रूग्णालयातील अव्यवस्थांवर त्वरीत अंकूश लावण्याचे निर्देश रूग्णालयाचे डीन डॉ. अजय केवलिया यांना दिले.
पाहणीत आमदार अग्रवाल यांनी, उन्हाच्या तडाख्यामुळे रूग्णांचे हाल होत असून रूग्णालयात थंड पेयजल व सर्वच वॉर्डांत कुलरची व्यवस्था करण्याचे निर्देश डॉ. केवलिया यांना दिले. तसेच रूग्णालयात औषधींचा साठा करण्याचे निर्देश देत मागील वर्ष भरापासून बंद पडून असलेल्या सिटी स्कॅन मशीनच्या विषयाला घेऊन आरोग्य विभागाच्या गैरजबाबदार व्यवहारावर नाराजगी व्यक्त केली. यावर डीन डॉ. केवलिया यांनी मशीन दुरूस्तीचे मागील वर्षाचे सुमारे १० लाख रूपयांचे पेमेंट थकून असल्याने संबंधीत कंपनी मशीन दुरू स्तीसाठी कचरत असल्याचे सांगीतले. तर या विषयाला घेऊन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या दौऱ्यात त्यांना माहिती दिली होती. मात्र आरोग्य मंत्र्यांच्या आश्वासना नंतरही पेमेंटमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगीतले.
संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन करून आमदार अग्रवाल यांनी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ. वीजय सतबीर सिंग यांच्याशी फोनवर चर्चा करून त्वरीत कारवाईची मागणी केली. तसेच सिटी स्कॅन मशीन दुरूस्ती त्वरीत करता यावी यासाठी मुंबई विधानभवनातील त्यांच्या कार्यालयात आरोग्य सचिव डॉ. वीजय सतबीर सिंग, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, सिटी स्कॅन मशीन दुरूस्तीसाठी कंपनीचे प्रतिनीधी यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे.
या दौऱ्यात आमदार अग्रवाल यांच्यासोबत कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी, नगरसेवक शकील मंसूरी, राकेश ठाकूर, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, देवा रूसे, मंटू पुरोहीत, पराग अग्रवाल, सुशिल रहांगडाले, दिल्लू गुप्ता, व्यंकट पाथरू, सुनिल तिवारी, बलजीतसिंह बग्गा प्रामुख्याने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)