नगरपंचायतीचा प्रचार सोशल मीडियावर
By Admin | Updated: October 28, 2015 02:02 IST2015-10-28T02:02:57+5:302015-10-28T02:02:57+5:30
जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून संधी दिल्यास या भागाचा विकास करण्यास आपणच कसे सक्षम आहोत,

नगरपंचायतीचा प्रचार सोशल मीडियावर
लाखांदूर : जिल्ह्यातील तीन नगर पंचायतींच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून संधी दिल्यास या भागाचा विकास करण्यास आपणच कसे सक्षम आहोत, अशा प्रचाराचा व्हॉटसअॅप या सोशल मीडियावर धूर उडाला आहे. या निवडणुकीत सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती आहेत.
जिल्ह्यात तीन नगरपंचायतींची स्थापना होऊन मोहाडी, लाखनी, लाखांदूर येथे नगर पंचायतींची प्रथमच निवडणूक होत आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्याच पक्षाने जिंकावी, अशी अपेक्षा सर्वच पक्षांचे पदाधिकारी व्यक्त करीत असून त्यादृष्टिने मोर्चेबांधणी सुरू झाली असून मतांचा जोगवा मागणे सुरू आहे. या निवडणुकीसाठी सर्व फंडे उमेदवार आजमावित आहेत. प्रभागातील मतदारांचे मोबाईलवर तसेच विविध व्हॉटसअॅप ग्रुपवर गूड मॉर्निंगपासून ते गूड नाईटपर्यंत शुभेच्छा मेसेजचा वर्षाव सुरू झाला आहे. विविध ठिकाणी सोशल मिडियावरील प्रचार चांगलाच रंगात आला आहे. निवडणूक होत असल्याने तिन्ही नगरपंचायतीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना, बसपा यासह विविध राजकीय पक्षाच्या संघटना व अपक्ष उमेदवारांचा बोलबाला दिसत आहे.
जिल्ह्यात तीन नगर पंचायतींचे गठन झाल्यानंतर आतापर्यंत यापूर्वीच्या ग्रामपंचायतींवर काहींची मक्तेदारी होती. परंतु आता नवीन नगरपंचायत निर्माण होऊन या ठिकाणी निवडून येणारे नगरसेवक म्हणून जनतेत वावरणार आहेत. यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू असतानाच निवडणूक प्रचाराचा नवा फंडा आता नगरपंचायतीच्या निवडणुकीत सोशल मीडियाची धूम सुरू आहे. येत्या आठ दिवसांत प्रभागातील नगरसेवक कोण असणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे.
विविध प्रभागातील लढतीचे चित्र अस्पष्ट आहे. गावागावात प्रचाराचे आघाडी घेतली आहे. ताई माई आक्का अमुक चिन्हावर मारा शिक्का, असा स्वरुपाचा प्रचार आता कालबाह्य झाला असला तरी सोशल मीडियावरील प्रचाराने जोर पकडला आहे. विविध ग्रुपच्या माध्यमातून उमेदवार आपला संदेश पोहचवून विकास कामे, नियोजित विकास कामाचा आराखडा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)