सार्वजनिक सुरक्षा वाऱ्यावरच!

By Admin | Updated: March 4, 2015 01:15 IST2015-03-04T01:15:35+5:302015-03-04T01:15:35+5:30

नागपूर-रायपूर रेल्वेमार्गावरील प्रमुख ठिकाण असलेल्या आणि नक्षलग्रस्त जिल्ह्याचे मुख्यालय

Public safety is on the wind! | सार्वजनिक सुरक्षा वाऱ्यावरच!

सार्वजनिक सुरक्षा वाऱ्यावरच!

आज राष्ट्रीय सुरक्षा दिन : रेल्वे स्थानक, बस स्थानक, दवाखाने, न्यायालय असुरक्षित
मनोज ताजने/देवा शहारे गोंदिया

नागपूर-रायपूर रेल्वेमार्गावरील प्रमुख ठिकाण असलेल्या आणि नक्षलग्रस्त जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या गोंदिया शहरातील सार्वजनिक स्थळांची सुरक्षा धोक्यात आहे. रेल्वे स्थानक, बस स्थानक, सरकारी रुग्णालये, न्यायालय आदी ठिकाणं किती असुरक्षित आहेत याचे ‘स्टिंग आॅपरेशन’ लोकमतने मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या पूर्वसंध्येला केले. यात सुरक्षा यंत्रणेचा बेफिकीरपणा चव्हाट्यावर आला.
एखादी बेवारस वस्तू नजरेस पडली तर लगेच दक्ष होऊन संबंधितांना त्याची माहिती देण्याचा शहाणपणासुद्धा कुठल्याच कर्मचाऱ्याने, प्रवाशाने किंवा नागरिकाने दाखविला नाही. यावरून गोंदियाकर आपल्या सुरक्षेबाबत किती दक्ष आहेत याची कल्पना आली. गोंदिया रेल्वेस्थानकावरून दररोज ९० प्रवासी गाड्या धावतात. रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच चौकशी कक्ष आणि उजव्या बाजुला तिकीट खिडक्या आहेत. मधल्या ऐसपैस जागेत बाहेरगावाहून आलेले प्रवासी पुढील प्रवासाला जाण्यापूर्वी गाडीची वाट पाहात तिथे बसलेले असतात. याच ठिकाणी ‘लोकमत’ चमूने एक बॅग ठेवली. पण त्या बेवारस बॅगमध्ये काही घातपात घडविण्याचे साहित्य तर नाही, अशी शंकाही कुणी घेतली नाही. बराच वेळ ती बॅग ठेवल्यानंतरही कोणीच लक्ष दिले नाही.
सायंकाळी ४.१० च्या सुमारास बल्लारशहा-गोंदिया ही लोकल गाडी आली. त्यावेळी जिन्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या लोंढ्यात ती बॅग एका बाजुला ठेवण्यात आली. मात्र कोणालाही त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकातील अंतर्गत सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचेही त्याकडे लक्ष नव्हते. रेल्वे स्थानकांच्या परिसरात ३४ कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यात स्थानकावरील सर्व हालचाली टिपता येतात. त्यामुळे एखादी बेवारस वस्तू दिसली की वेळीच त्याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला, रेल्वे पोलिसांना व रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना देणे अपेक्षित आहे. पण तसे झाले नाही. त्यामुळे स्थानकावरील सुरक्षा यंत्रणा किंवा येथील क्लोज सर्कीट कॅमेरे कुचकामी असल्याचे दिसून येते.
गोंदियातील बस स्थानकावर सायंकाळी ४.५० च्या सुमारास बाहेरगावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी होती. त्या गर्दीतच तेथील प्रवाशांच्या बाजूला बॅग ठेवून दुरून त्यावर लक्ष ठेवण्यात आले. मात्र कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही. बस स्थानकावर लाखो रुपये खर्च करून नवीनीकरण करण्यात आले. मात्र तिथे सीसीटीव्ही कॅमेरे अजून दिसले नाही.
लोकमत चमूने याच पद्धतीने सतत वर्दळ राहणाऱ्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या तळमजल्यावर ही बॅग ठेवली. आपल्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी येणाऱ्या अनेकांनी त्या बॅगकडे पाहिले. एवढेच नाही तर तिथे एका प्रकरणी सुनावणीसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेही बॅगकडे पाहिले पण त्यावर कोणताही संशय व्यक्त केला नाही. बसायला जागा करण्यासाठी एका युवकाने ती बॅग बाजुला सरकवली, पण ती बॅग बेवारस का पडून आहे असा प्रश्न त्याला पडला नाही.
गोंदियातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात जिल्हाभरातूनच नाही तर जिल्ह्याच्या बाहेरूनही रुग्ण येतात. या ठिकाणी आवारात रुग्णांच्या नातेवाईकांच्या जवळच स्टिंग आॅपरेशनकरिता ठेवलेली बॅग ठेवण्यात आली.
मात्र कोणीही त्या बॅगबद्दल चौकशी केली नाही. यावरून सार्वजनिक सुरक्षेच्या बाबतीत नागरिक किती अनभिज्ञ आणि बेफिकिर आहेत याचा प्रत्यय आला. नक्षलदृष्ट्या संवेदनशिल असलेल्या गोंदियात अशा पद्धतीने कोणीही काहीही घातपात करू शकते हेच यावरून दिसून आले.

रेल्वे स्थानकावर मेटल डिटेक्टरच नाही
रेल्वेस्थानकाच्या सुरक्षिततेसाठी चार वर्षापूर्वी मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते. परंतु सहा महिन्यानंतरच हे मेटल डिटेक्टर काढण्यात आले. दोन्ही बाजूच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक पादचारी पूलावर हे मेटल डिटेक्टर बसविण्यात आले होते. परंतु ते काढण्यात आल्याने आता स्थानकावरील सुरक्षा आणखीच ढिसाळ झाली आहे. रेल्वे विभागाने मेटल डिटेक्टर काढून अशी उदासीन का दाखवावी, हे न समजणारे कोडे ठरत आहे.
सीसीटीव्ही कुचकामी, सुरक्षा रक्षकही बेपत्ता
रेल्वेस्थानकासह काही सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असूनही त्याचा काहीच फायदा नसल्याचे दिसून आले. एखादी विघ्नसंतोषी व्यक्ती त्या कॅमेरात कुकृत्य करताना दिसेलही, आणि नंतर त्या व्यक्तीला पकडताही येईल, पण ते कृत्य करण्यास प्रतिबंध घालण्यासाठी त्या कॅमेरांचा काहीच उपयोग नसल्याचे दिसून आले.

Web Title: Public safety is on the wind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.