पुरविलेले साहित्य शाळेतच
By Admin | Updated: August 27, 2016 00:09 IST2016-08-27T00:09:40+5:302016-08-27T00:09:40+5:30
जि.प. शाळांचा सर्वांगिण विकास व्हावा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी तांत्रिक उपकरणांची सोय केली जाते.

पुरविलेले साहित्य शाळेतच
सुरेश हर्षे : राजकीय सुडबुद्धीतून मानहानीचा प्रयत्न
गोंदिया : जि.प. शाळांचा सर्वांगिण विकास व्हावा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी तांत्रिक उपकरणांची सोय केली जाते. परंतु त्यासाठी मिळणाऱ्या विकास निधीची अफरातफर करून शासनाच्या योजनांना कागदावर रेखाटन्याचे कार्यच जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांनी केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. मात्र साहित्य शाळेला उपलब्ध झाले असून सदर आरोप राजकीय सुडबुद्धीतून करून माझी मानहानी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे हर्षे यांनी सांगितले आहे.
आमगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कट्टीपार येथे विकास कामे करण्यासाठी जि.प.ने जिल्हा विकास निधी मंजूर केले. यात ९५ हजार ५८२ रूपये रंगरंगोटी, संगणक प्रयोगशाळा व साहित्य खरेदीसाठी निर्धारित करून आवंठित केले. तसेच खर्चाचे नियोजन उपविभागीय अधिकारी जि.प. सा.बां. उपविभाग आमगावकडे वर्ग करण्यात आले.
मात्र शाळेत संगणक कक्ष व संगणक साहित्य खरेदी न करता निधीची उचल करण्यात आली. यात शाळा समिती अध्यक्षांनी या निधीसंदर्भात अनेकदा मुख्याध्यापक व संबंधित विभागाकडे संपर्क साधून कक्ष तयार करण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु संबंधित विभागाने सदर निधी उचल करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे या निधी अफरातफरचे प्रकरण पुढे आले. जिल्हा विकास निधी शाळेला मंजूर व्हावा, यासाठी शाळा पातळीवर प्रयत्न करण्यात आले. परंतु स्थानिक जि.प. सदस्य यांनी मंजूर निधीची अफरातफर करण्यासाठी पुढाकार घेतला, असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सरपंच यांनी केला. याबाबत त्यांनी लेखी निवेदन देवून दखल घेण्याची मागणी केली होती.
या प्रकाराबाबत जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत कट्टीपार येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं. विभाग) जि.प. गोंदियाने १६ जून २०१६ ला १० लाख ६४ हजार १७१ रूपयांची अफरातफर केली. त्यासाठी त्यांना शोकास नोटीस बजावले.
तसेच सचिव महाकाळकर यांचे निधी अफरातफरबाबत जि.प.ने निलंबनाचे प्रस्ताव तयार केले. मी या गावचा रहिवासी असल्यामुळे ग्रामपंचायतची चौकशी करायला लावले, असा ठपका ठेवून सरपंचाने तक्रार केली.
तसेच जिल्हा परिषदेमध्ये होत असलेला भ्रष्टाचार व सामान्य नागरिकांशी वाढलेल्या भ्रष्टाचाराबाबत स्थायी समितीत मुद्दा उपस्थित करतात, यासाठी शिक्षण सभापती व जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी ब्लॅकमेलिंगसाठी प्रेरित केले, हे त्यांच्या पत्रावरून सिद्ध होते. त्याचप्रमाणे सरपंच, सचिवाच्या निलंबनाचे प्रस्ताव थांबविण्यासाठी व गावात होणारे भ्रष्टाचार दाबण्यासाठीच माझी खोटी तक्रार करण्यात आली, असे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सदस्य सुरेश हर्षे यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)
धनादेश कंत्राटदाराच्या नावे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कट्टीपार येथे साहित्य पुरवठा करण्यासाठी धनादेश कंत्राटदार तारेंद्र रामटेके यांच्या नावे होता. त्यांनी धनादेश वठविला व साहित्य पुरवठा केला. यात जि.प. सदस्य हर्षे यांची कसलीही भूमिकाच नाही. साहित्य खरेदी झालेला असून त्याची पोचपावती ६ जून २०१६ ला प्राप्त झाली आहे. यात धनादेश वठविण्यापूर्वी जर उधारी साहित्य खरेदी करून शासकीय यंत्रणेला पुरवून नंतर रक्कम देण्यात आली असेल तर हा खरेदी करणार कंत्राटदार व विक्री करणारा दुकानदार यांचा संबंधाचा प्रश्न आहे, असे हर्षे म्हणाले.
तपासणीत शाळेत आढळले साहित्य
चौकशी अधिकारी वाघाये यांनी जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा कट्टीपार येथे पाहणी केली असता त्यांना शैक्षणिक संगणक साहित्य आढळले. तसेच जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांनीसुद्धा पाहणी केल्यावर त्यांनाही संगणक साहित्य आढळले. संगणक, स्कॅनर, प्रिंटर, प्रोजेक्टर आदी साहित्य शाळेला ६ जून २०१६ रोजीच प्राप्त झाल्याचे सदर शाळेच्या केंद्र मुख्याध्यापकांचे पत्र आहे. तसेच शाळा समिती सदस्य (डिजिटल) तथा माजी सरपंच सुरेंद्र कोटांगले यांनी शाळेत साहित्य असल्याबाबत ग्वाही दिली.
सर्व आरोप बिनबुडाचे
ग्रामपंचायतमधील अनेक कामातील अनियमितता समोर करीत त्याची शासनाकडे तक्रार केली. ग्रामपंचायतमधील भावाला मिळालेली ई-निविदेचे देयक ग्रामपंचायतने थांबविले, याची तक्रारही प्रशासनाला केली. त्यामुळे राजकीय सुडबुद्धीने ग्रामपंचायतचे पदाधिकारी व शाळा समिती आरोप करीत आहे. याला जिल्हा परिषदेतील पदाधिकारीही खतपाणी घालत आहेत. खरे तर सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.
-सुरेश हर्षे
जि.प. सदस्य