कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:49+5:302021-04-25T04:28:49+5:30
बिरसी फाटा : महावितरणकडून कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करण्यात येत नसल्याने कृषी पंपधारक शेतकरी अडचणीत आले असून उन्हाळी धान पिकांवर ...

कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करा
बिरसी फाटा : महावितरणकडून कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करण्यात येत नसल्याने कृषी पंपधारक शेतकरी अडचणीत आले असून उन्हाळी धान पिकांवर सुद्धा संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा,अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
मागील काही दिवसापासून गोंडेगाव फिडरवरील काही गावातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा झाला आहे. या विषयात वारंवार संबंधितांना सांगूनही सुधारणा न झाल्याने कनिष्ठ अभियंता महावितरण पालांदूर यांना समस्येचे निवारण करण्याच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आहे. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. गुरढा,गोंडेगाव परिसरासह गावातील वीज समस्या मागील पंधरा दिवसापासून ऐरणीवर आलेली आहे. धान पिकासह बागायतीचे क्षेत्र अधिक असल्याने पाण्याची नितांत गरज आहे. दिवसेंदिवस उन्ह वाढत असल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. कृषिपंपांना नियमित वीज मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषिपंपांना किमान १२ तास वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच या परिसरातील वीज कर्मचाऱ्याची बदली करण्यात यावी. या मागण्यांचे निवेदन कनिष्ठ सहाय्यक अभियंता मयंक सिंह यांना देण्यात आले आहे. यावर तोडगा न काढल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.