२४ तास अखंड वीजपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:36+5:302021-07-07T04:35:36+5:30
साखरीटोला : परिसरात वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यातच आता राज्य शासनाने १ जुलैपासून ...

२४ तास अखंड वीजपुरवठा करा
साखरीटोला : परिसरात वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यातच आता राज्य शासनाने १ जुलैपासून शेतकऱ्यांना फक्त ८ तासांकरिता वीजपुरवठा करणार असल्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होणार असून २४ तास अखंड वीजपुरवठा करा अशी मागणी वीजग्राहक व शेतकऱ्यांनी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
साखरीटोला येथे ३३ केव्हीचे वीज उपकेंद्र असून त्याद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना दररोज सकाळी ९.३० वाजतापासून सायंकाळी ५ वाजतापर्यंत म्हणजे फक्त ८ तास वीजपुरवठा होणार आहे. पॉवरहाऊसमधून ऑटोमेटिक पद्धतीने तशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे. म्हणजेच हा प्रकार शेतकऱ्यांचा घात करणारा आहे. भाजप शासन काळात लोडशेडिंग या ‘शब्दा’लाच अंतिम विराम लागले होता. त्याकाळात थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. तर त्यावर तोडगा काढून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात आले. मात्र, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा घात केला असा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत. ८ तास वीजपुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना पिकांना पाणीही देता येणार नाही. त्यात ग्रामीण परिसरात वीजदाब अत्यंत कमी राहतो. सततची नापिकी व लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता खरीप हंगामाची सुरुवात होताच वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने शेतकरी व वीजग्राहक संताप व्यक्त करीत आहेत. अशात राज्य शासन व लोकप्रतिनिधींनी याकड़े लक्ष देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करावा अन्यथा शेतकरी आंदोलनाच्या मार्गाने पुढे जाणार, अशी इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
------------
मागणीच्या तुलनेच उत्पादन कमी
मागणीनुसार विजेचे उत्पादन कमी असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्याना ८ तास वीजपुरवठा होणार आहे. असे ऑटोमेटिक शेड्यूल तयार करण्यात आले असल्याचे शाखा अभियंता पाटील यांनी सांगीतले. त्यामुळे शासननिर्णयाची अंमलबजावणी होणार असून याचा मात्र शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.