दिव्यांगांच्या विकासासाठी तीन टक्के निधी द्या
By Admin | Updated: March 20, 2017 01:01 IST2017-03-20T01:01:55+5:302017-03-20T01:01:55+5:30
दिव्यांग हा समाजातील अविभाज्य घटक आहे. त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सन १९९५ च्या समान हक्क, समान संधी,

दिव्यांगांच्या विकासासाठी तीन टक्के निधी द्या
आंदोलनाचा इशारा : नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन
गोंदिया : दिव्यांग हा समाजातील अविभाज्य घटक आहे. त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सन १९९५ च्या समान हक्क, समान संधी, अपंग पुनर्वसन कायद्यांतर्गत व महाराष्ट्र शासनाच्या २०१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पाच्या तीन टक्के निधीची दिव्यांग विकासासाठी तरतूद करावी. तसेच दिव्यांगांची नोंद घेवून सदर निधी खर्च करावा, असे अपेक्षित असतानाही प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दिव्यांगांकडे दुर्लक्ष करून गोंदिया व तिरोडा नगर परिषदांची याची दखल घेतली नाही.
अपंग कल्याणकारी संघटनेचे सचिव दिनेश पटले व शहर प्रमुख आकाश मेश्राम यांच्या नेतृत्वात नगर परिषद गोंदिया येथे नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांची भेट घेवून दिव्यांगांच्या समस्या व मागण्या यांच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार, दिव्यांग व्यक्तींना मिळकत व घर करामध्ये कुटुंब प्रमुखाची अट न लावता ५० टक्के सवलत देण्यात यावे. व्यवसाय करण्यासाठी गाळे द्यावे. बचत गटांना व्यावसाईक प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य म्हणून पीठ गिरणी, शिलाई मशीन, मिर्ची कांडप मशीन, फुड प्रोसेसिंग मशीन, ऊस ज्युस मशीन, झेरॉक्स मशीन, डीटीपी जॉबवर्क्ससाठी संगणक संच किंवा रस्त्याच्या कडेला लावता येईल असा लोखंडी व्हेंडिंग स्टॉल द्यावे. गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. व्यायसायिक गाळे खरेदीसाठी आर्थिक सहाय्य द्यावे. राहणीमान उंचावण्यसाठी घरगुती वस्तू सौर कंदील, सौर बल्व आदी साहित्य द्यावे. बॅटरीचलित तीनचाकी सायकल द्यावे. दिव्यांगांसाठी सल्ला व मार्गदर्शन केंद्र स्थापन करावे. शौचालय व घरकूल योजनेत दिव्यांगांना प्राधान्य द्यावे.
सन २०१५-१६ व २०१६-१७ या आर्थिक वर्षांच्या अनुशेषासह तीन टक्के निधी, उपरोक्त दिव्यांग विकास आराखडा व शहरातील दिव्यांगांची संख्या यांची सांगड घालून प्राधान्यक्रमानुसार व संघटनेला विश्वासात घेवून सदर निधी खर्च करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी संघटनेच्या शिष्टमंडळात अध्यक्ष दिगंबर बन्सोड, सचिव दिनेश पटले, कोषाध्यक्ष आकाश मेश्राम, शहर अध्यक्ष विनोद शेंडे, शहेबाज शेख, राखी चुटे, चंद्रशेखर कुंभरे, शोभेलाल भोंगाडे, सीमा श्रीवास्तव व शहरातील दिव्यांग उपस्थित होते. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी १५ एप्रिलपर्यंत मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले व आंदोलन करण्याचा प्रसंग येणार नाही, असे संघटनेला सांगितले. तरी संघटेनचे समाधान झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल, असे संघटनेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)