प्रशासकीय यंत्रणांनी लोकाभिमुख सेवा द्यावी

By Admin | Updated: April 23, 2015 00:41 IST2015-04-23T00:41:18+5:302015-04-23T00:41:18+5:30

आज लोकांच्या, लोकप्रतिनिधींच्या विकास कामांबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Provide people-oriented service through administrative systems | प्रशासकीय यंत्रणांनी लोकाभिमुख सेवा द्यावी

प्रशासकीय यंत्रणांनी लोकाभिमुख सेवा द्यावी

जिल्हाधिकाऱ्यांची सूचना : नागरी सेवा दिनानिमित्त कार्यशाळा
गोंदिया : आज लोकांच्या, लोकप्रतिनिधींच्या विकास कामांबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काही चांगली कामे झाल्यामुळेच अपेक्षेमध्ये भर पडली आहे. प्रशासकीय सेवा देताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. विविध विकासकामे करण्यासोबतच गरजूंना योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी लोकाभिमुख सेवा द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नागरी सेवा दिनानिमित्त सोमवारी (दि.२०) आयोजित कौशल्य विकास कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक डी.एस. भोयर यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक डी.एस. भोयर यांनी कौशल्य विकास अभियानाचे सादरीकरण केले. कौशल्य विकास कार्यक्रम हा पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून यासाठी त्रिस्तरीय संस्थात्मक रचना करण्यात आली असून राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास कार्यक्रम म्हणून राबविण्यात येणार आहे, असे सांगितले. कार्यशाळेला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)

संगणक-इंटरनेटमुळे आली गतीशिलता
जिल्हाधिकारी सुर्यवंशी म्हणाले, सरकारी यंत्रणेमध्ये काम करताना येणारे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. आजचे युग हे संगणकाचे युग असल्यामुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कामात गतिशीलता आली आहे. मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत. पारदर्शकता मोठ्या प्रमाणात आल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. प्रत्येक विषयाबाबत लोकशाही सुदृढ झाल्याचे दिसून येत आहे.
शासकीय यंत्रणा ही लोकांची काम करणारी यंत्रणा झाली आहे असे सांगून जिल्हाधिकारी सुर्यवंशी म्हणाले, विभागाला दिशा देण्याचे काम विभाग प्रमुखांनी करावे. आदर्श काम करून कर्मचाऱ्यांमध्ये व जनतेमध्ये लोकाभिमुख व्हावे, सेवा कायदा येणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी गांभीयपूर्वक काम करावे.
७० टक्यापेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी स्वयंप्रेरणेने काम करतात. लोकांना सेवा देत असताना आपल्याला त्यातून समाधान मिळते. त्याचे आपण मुल्यमापन करू शकत नाही. जास्तीत जास्त लोकांच्या हितासाठी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
उपवनसंरक्षक रामगावकर म्हणाले, तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी कौशल्य विकसीत केले पाहिजे. गोंदिया जिल्हा हा ४७ टक्यापेक्षाही जास्त जंगलाने व्यापलेला आहे. गौण वनउपज व पर्यटन क्षेत्रातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देता येवू शकेल. त्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिल्यास जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होवू शकतो असे ते म्हणाले.

Web Title: Provide people-oriented service through administrative systems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.