शेतकऱ्यांना जास्तीत जास्त खरीप पीक कर्ज द्या

By Admin | Updated: May 9, 2016 01:52 IST2016-05-09T01:52:47+5:302016-05-09T01:52:47+5:30

जिल्ह्यात २ लाख ३१ हजार खातेदार शेतकरी आहेत. मागील वर्षी केवळ ४४ हजार शेतकऱ्यांनाच बँकांनी खरीप पीक कर्ज वाटप केले होते.

Provide maximum kharif crop loans to farmers | शेतकऱ्यांना जास्तीत जास्त खरीप पीक कर्ज द्या

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त खरीप पीक कर्ज द्या

विजय सूर्यवंशी यांचे निर्देश : बँक व्यवस्थापकांची कार्यशाळा
गोंदिया : जिल्ह्यात २ लाख ३१ हजार खातेदार शेतकरी आहेत. मागील वर्षी केवळ ४४ हजार शेतकऱ्यांनाच बँकांनी खरीप पीक कर्ज वाटप केले होते. हे प्रमाण जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या पाहता अत्यंत कमी असून राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खातेदार शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाचे वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील बँक व्यवस्थापकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय अहेर, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिल श्रीवास्तव उपस्थित होते. डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांना बँकाद्वारे जे कर्ज वाटप करण्यात येते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वाटा ६० टक्के तर राष्ट्रीयकृत बँकांचा वाटा ४० टक्के आहे. कर्जदार शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता ७५ टक्के शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वाटप करते. तर केवळ २५ टक्के शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँक कर्ज वाटप करते.
कर्जदार व बिगर कर्जदार सभासद शेतकरी यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँकांनी घ्यावी, असे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५० हजार नवीन सभासद शेतकऱ्यांना कर्ज वाटप या बँकांनी करावे. कर्ज वाटपात सुलभता येण्यासाठी बँकांनी मंडळ स्तरावर कर्ज मेळावे घ्यावे. कर्ज घेण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे याची माहिती बँकांनी दर्शनी भागात लावावी. संबंधित शेतकऱ्यांना त्यामुळे कागदपत्रांची पुर्तता करुन कर्ज घेणे सोईचे होईल असेही सांगितले.
सन २०१५-१६ च्या हंगामात जिल्ह्यातील १०९ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे सांगितले. या गावातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठण करुन त्या गावातील शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे. पंतप्रधान पीक विमा योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनेत सहभागी करु न घ्यावे.
बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना देण्यासाठी बँकांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक उत्तरदायित्वातून काम करावे असेही डॉ.सूर्यवंशी म्हणाले. या कार्यशाळेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, राष्ट्रीयकृत बँकेचे व ग्रामीण बँकेचे जिल्हा समन्वयक तसेच शाखा व्यवस्थापक यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Provide maximum kharif crop loans to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.