शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठा करा

By Admin | Updated: June 1, 2016 02:25 IST2016-06-01T02:25:09+5:302016-06-01T02:25:09+5:30

पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीत गुंतला आहे. त्यांना विविध पिकांची लागवड करण्यासाठी बि-बियाणे,

Provide loans to farmers immediately | शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठा करा

शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठा करा

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : बँक प्रतिनिधींची जिल्हास्तरीय आढावा सभा
गोंदिया :  पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे. त्यामुळे शेतकरी मशागतीत गुंतला आहे. त्यांना विविध पिकांची लागवड करण्यासाठी बि-बियाणे,रासायनिक खते व कीटकनाशके खरेदी करण्यासाठी जिल्हयातील सर्व बँकांनी शेतकरी खातेदारांना तातडीने खरीप पिक कर्जाचा पुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी आयोजित जिल्हास्तरीय बँक आढावा सभेत जिल्हाधिकारी बोलत होते. सभेला अग्रणी जिल्हा प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, जि.प.चे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, भारतीय रिझर्व बँकेच्या नागपूर कार्यालयाचे अग्रणी जिल्हा अधिकारी अनिल मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हयात २ लाख १२ हजार शेतकरी असल्याचे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पिक कर्जाचा लाभ घेतला नाही, त्या शेतकऱ्यांना बँकांनी प्राधान्याने पीक कर्ज द्यावे. पिक विमा योजना आता सुलभ झाली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा. रोजगार हमी योजनेवरील मजूर, रिक्षेवाले, पानटपरी, अस्वच्छ, व्यवसायात काम करणारे कामगार अशा असंघटीत स्वरूपातील कामगारांनी प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास बँकांची उदासीनता दिसत असल्यामुळे शेतकरी कर्जासाठी सावकारांकडे धाव घेतात. भविष्यात पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जाण्याची वेळ येवू नये यासाठी विविध बँकांच्या शाखांनी संबंधित गावातील शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्यावे. या सभेला जिल्हयातील सहकारी बँक, विदर्भ-कोकण ग्रामीण बँक व राष्ट्रीयकृत बँकांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Provide loans to farmers immediately