विद्यार्थ्यांसाठी संरक्षणात्मक मार्गदर्शन
By Admin | Updated: December 2, 2014 23:09 IST2014-12-02T23:09:40+5:302014-12-02T23:09:40+5:30
गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीत सभा घेऊन गावात शांतता व सुव्यवस्था कशी ठेवता येईल, वाद कसे थांबवता येतील यावर ठाणेदार सुरेश कदम यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांसाठी संरक्षणात्मक मार्गदर्शन
सुरेश कदम : मुख्याध्यापकांना संपर्क करून विद्यार्थ्यांसाठी वेळ मागू
काचेवानी : गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीत सभा घेऊन गावात शांतता व सुव्यवस्था कशी ठेवता येईल, वाद कसे थांबवता येतील यावर ठाणेदार सुरेश कदम यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. गावकऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा अंगीकार केल्यामुळे आता गावात शांतता दिसून येत आहे. आता ठाण्यांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी संरक्षणात्मक मार्गदर्शन कार्यक्रम राबविणार, असे गंगाझरीचे ठाणेदार सुरेश कदम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
शालेय स्तरावर शिक्षण घेणारे मुले-मुली विविध व्यसनाखाली सापडत आहेत. काही ठिकाणी वाईट सवयींच्या बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांना स्वत:ची काळजी कशी घेता येईल, स्वत:चे रक्षण कसे करता येईल याची जाणीव त्यांना मार्गदर्शनातून करून देण्यात येईल. सार्वजनिक गणेश उत्सवादरम्यान १५ ते २० गावातील ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत, महिला मंडळ व नागरिकांची सभा घेतली होती. त्यातून एकोप्याने व प्रेमभावाने उत्सव साजरे करुन व्यसनबाजी टाळावी, पालकांनी आपल्या पाल्यावर चोख नजर ठेवावी, मोबाईलचा दुरुपयोग टाळावा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून नागरिकांत जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने कायद्याची जाणीव करुन दिली होती. गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारची जागृती मोहीम प्रथमच गंगाझरीचे ठाणेदार सुरेश कदम यांनी राबविली होती. या उपक्रमाची आणि मार्गदर्शनाबाबत गावस्तरावर ठाणेदार कदम यांची प्रशंसा करण्यात आली.
शालेय स्तरावर शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलीत ज्ञानाची परिपक्वता कमी असल्याने त्यांना उत्तम सवयीकडे कसे वळवता येईल, ते वाईट मार्गाचा अवलंब करणार नाही, त्यांच्यात कायद्याची थोडीफार जाणीव व्हावी, स्वत:ची सुरक्षा स्वत:ला कशी करता येईल आणि शैक्षणिक क्षेत्रासंबंधी सांगता येईल तेवढी माहिती विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. सदर उपक्रम राबविण्याकरिता मुख्यध्यापकांना अर्धा ते एक तासाची वेळ मागून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत हे उपक्रम राबविणार असल्याचे ठाणेदार सुरेश कदम यांनी भेटीदरम्यान सांगितले.
मोबाईचे दुरुपयोग कसे टाळता यईल. मोबाईल व सीम कार्ड वापरताना कोणती काळजी घ्यावी. त्याचबरोबर आपत्तीचा प्रसंग निर्माण झाल्यास कोणती आणि कोणाची कशी मदत घ्यावी या संबंधात माहिती सांगण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही ठाणेदारांची बोलून दाखविले.
गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत जवळपास एकूण ५५ गावे आहेत. त्यांनी प्रत्येक गावाची पाहणी केली असून गावातील वातावरण समाधानकारक असून आपल्या काळात अतिशय गंभीर स्वरुपाच्या घटना घडल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले.
धामनेवाडा येथील बेपत्ता करण राऊत याच्या शोध कार्यात तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शोधचक्र फिरविल्याने गंगाझरी पोलिसांना यश आले. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांतील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी दिवसेंदिवस नागरिकांत निर्माण होणारी जागृती व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडून पोलिसांना मिळणारे सहकार्य कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. गंगाझरी ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांना कसल्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी निसंकोचपणाने ठाण्यात येवून आपली बाजू ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. (वार्ताहर)