उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करा
By Admin | Updated: May 15, 2015 00:53 IST2015-05-15T00:53:08+5:302015-05-15T00:53:08+5:30
उन्हाळ्यातील तापमानापासून दुधाळ तसेच इतर जनावरांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे आवश्यक आहे.

उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करा
गोंदिया : उन्हाळ्यातील तापमानापासून दुधाळ तसेच इतर जनावरांचे आरोग्यपूर्ण संगोपन होण्यासाठी समतोल व परिपूर्ण आहार देणे आवश्यक आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी शिंपडणे, भरपूर पाणी पाजणे, जीवनसत्व, कॅलरीज, क्षार यांचा समावेश असलेले खाद्य दिल्यानेच जनावरांचे योग्य संगोपन होऊ शकते. तीव्र उन्हापासून जनावरांचे संरक्षण व योग्य संगोपन पशुपालकांनी करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
उन्हाळ्यातील तापमान जनावरांना न मानवणारे असल्याने प्राथमिक स्तरावर दुधाळ जनावरांची काळजी घेताना जनावरांच्या गोठ्यात गोणपाट टाकून त्यावर पाणी शिंपडावे. दुधाळ जनावरांना दिवसातून दोन ते तीनवेळा थंड पाणी पाजावे. त्यामुळे तापमान संतुलीत राखण्यास मदत होईल. उन्हाळ्याच्या चार महिन्यांत हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने अशावेळी पूर्वतयारी म्हणून हिवाळ्यातच चाऱ्याचे नियोजन करावे.
पशुखाद्यात साधारणपणे प्रथिनांचा समावेश करण्यासाठी हिरव्या चाऱ्याचे नियोजन करावे. शरीर वाढ, नवीन पेशी व स्नायुंच्या बळकटीसाठी हिरवा मका किंवा ज्वारीचे पेंड हिवाळ्यात साठवून ठेवावे. ते उन्हाळ्यात जनावरांना चारा म्हणून उपयोगात आणता येईल.
उन्हाळ्यात शेतात हिरव्या चाऱ्याची लागवड करावी. त्यामुळे दुधाळ जनावरांना फायदा होऊ शकतो व पशुपालकांना दुधाचे अधिक उत्पन्न घेता येऊ शकते. त्यातून आर्थिक लाभ मिळवून घेता येईल.
उन्हाळ्यात जाणवणारी चाऱ्याची टंचाई टाळण्यासाठी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात चाऱ्याची साठवणूक करून ठेवावी, असा सल्ला जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. (प्रतिनिधी)