सावकारांविरूद्ध थोपटले दंड
By Admin | Updated: February 10, 2016 02:16 IST2016-02-10T02:16:32+5:302016-02-10T02:16:32+5:30
शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशाला मूठमाती देऊन काही परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना बनावट पावत्या दिल्याने अनेक शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहीले.

सावकारांविरूद्ध थोपटले दंड
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : समाजसेवकांचे उपोषण सुरू
अर्जुनी-मोरगाव : शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशाला मूठमाती देऊन काही परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांना बनावट पावत्या दिल्याने अनेक शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहीले. अशा सावकारांच्या विरोधात येथील समाजसेवकांनी दंड थोपटले असून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी त्यांनी सोमवारपासून (दि.८) उपोषण सुरू केले आहे. मंगळवआरी उपोषणाचा दुसरा दिवस असतानाही त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघालेला नाही.
प्राप्त माहितीनुसार, शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केली. मात्र अनेक सावकारांनी कर्जदारांना सोने तारण करताना साध्या कागदावर नोंद केलेल्या पावत्या दिल्या. काही पावत्या बनावट असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. यामुळे अनेक शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत. काही कर्जदारांनी सहायक निबंधकांकडे दाद मागितली. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. उलट न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला.
याविरूद्ध शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मोरेश्वर सौंदरकर यांनी दंड थोपटून आमरण उपोषण सुरू केले. वडेगाव स्टेशन येथील विजय खुणे व तिडका-करड येथील हिराजी बावने यांनी दुसऱ्या मंडपात आमरण उपोषण सुरू केले आहे. वंचित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देऊन दोषी सावकारांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच स्थानिक पोलीस स्टेशनअंतर्गत अवैध धंदे बंद करण्याची मागणी सौंदरकर यांनी आहे.
सावकारांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून दोषी सावकारांचे परवाने रद्द करावे, विनापरवानाधारक परंतू व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी, वडेगाव-स्टेशन येथील पडझड प्रकरणाची पूर्ण चौकशी करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा व दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी खुणे व बावने यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)