तीन शाळा बंद करण्याचा प्रस्ताव
By Admin | Updated: July 24, 2015 01:14 IST2015-07-24T01:14:07+5:302015-07-24T01:14:07+5:30
मागील काही वर्षांपासून नगर परिषदेच्या शाळांच्या होणाऱ्या सततच्या उपेक्षेमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

तीन शाळा बंद करण्याचा प्रस्ताव
नजर आमसभेकडे : सिव्हिल लाईन्स शाळेत केवळ चार व टाऊन शाळेत पाच विद्यार्थी
गोंदिया : मागील काही वर्षांपासून नगर परिषदेच्या शाळांच्या होणाऱ्या सततच्या उपेक्षेमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या शाळांची स्थिती सातत्याने कमकुवत होत चालली आहे. मागील काही वर्षांत अनेक शाळांना बंद करावे लागले. आता आणखी काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर पोहोचल्या आहेत. कमीत कमी तीन शाळा आता तत्काल प्रभावाने बंद कराव्या लागतील. या शाळांना पुढे चालविण्यात काहीही अर्थ नाही. परंतु नगर परिषदेचे पदाधिकारी-अधिकारी राजकीय ईच्छाशक्तीच्या अभावाने पाऊल उचलण्यास हिंमत करीत नाहीत.
नगर परिषदेद्वारे संचालित ज्या तीन शाळांना बंद करणे गरजेचे आहे, त्यापैकी सिव्हील लाईन्स शाळेत केवळ चार विद्यार्थी आहेत. माताटोली येथील शाळेत १० व टाऊन स्कूलमध्ये केवळ पाच विद्यार्थी आहेत. ही संख्या १ जुलैची असून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आहे. चार वर्गात जर चारच विद्यार्थी आहेत, तर त्या शाळेला चालविण्याचा काहीही औचित्य नसते. मागील वर्षी सिव्हील लाईन्सच्या शाळेत केवळ सात विद्यार्थी होते. ही संख्या आता पुन्हा कमी झाली आहे. सध्या विद्यार्थी संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, परंतु ही संख्या किती वाढेल? असा प्रश्न आहे.
गोंदिया नगर परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने मागील वर्षी सदर तिन्ही शाळांना बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु आमसभेत सदर प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता. आता पुन्हा नवीन प्रस्ता बनविण्यात आला आहे. आमसभेची वाट बघितली जात आहे. आता नगर परिषदेला नवीन मुख्याधिकारी मिळाला आहे.
शक्यतो पुढील काळात आमसभेचे आयोजन होवू शकेल. मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला, परंतु नगर परिषदेची आमसभा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीही माहिती नाही. जर या शाळांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला तर त्या विद्यार्थ्यांना त्रास होईल, यात शंका नाही. (प्रतिनिधी)
आणखी काही शाळा प्रतीक्षेत
नगर परिषदेद्वारे संचालित प्राथमिक शाळांमध्ये व अनेक शाळांची स्थिती गंभीर आहे. मराठी माध्यमाच्या रामनगर शाळेत २४, डॉ. आंबेडकर शाळेत १९, संत गाडगेबाबा शाळेत २२, रेलटोली येथील शाळेत २९ व सावित्रीबाई फुले शाळेत १८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हिंदी माध्यमाच्या मालवीय शाळेत केवळ २० विद्यार्थी आहेत.
इंग्रजी माध्यमाचे शिक्षण केव्हा?
मागील वर्षी आमसभेत उपस्थित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी म्हटले होते की, सदर शाळांना बंद करण्याऐवजी इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यायला हवे. तत्कालीन मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्याशी चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, नवीन शिक्षकांची भरती केली जाईल. शाळा परिसर व वातावरणात बदल केले जाईल. खासगी शाळांशी स्पर्धा करण्याचे प्रयत्न केले जातील. परंतु या दिशेने अद्याप कसलेही पाऊल उचलण्यात आले नाही. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे शिक्षण विभागाचे उपसंचालकांकडून अनुदान व मंजुरी मिळवावी लागते. त्यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आले नाही. नगर परिषदेद्वारे अनेक वर्षांपासून केवळ एकच कॉन्व्हेंट शाळा चालविली जात आहे. त्याचा संपूर्ण खर्च नगर परिषद उचलते. जर इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू झाले तर नगर परिषदेवर भार वाढेल. अशात त्या शाळांना केवळ बंद करण्याचा निर्णयच घेतला जावू शकतो.
सेमी-इंग्रजीची तयारी नाही
मागील काही काळापूर्वी नगर परिषदेच्या शाळांमध्ये सेमी-इंग्रजीची तयारी करण्यास सांगण्यात आले होते. याबाबत प्रस्तावही आमंत्रित करण्यात आले होते. केवळ काही शाळांनीच प्रस्ताव दिले होते. अधिकतर शाळांनी पहिल्या वर्गापासून सेमी-इंग्रजी सुरू करण्यात आवड दाखविली नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनविणे व त्यांना उत्तम शिक्षण देऊन आपली नोकरी वाचविण्यासाठीसुद्धा कोणतेही पाऊल उचलण्यास नगर परिषदेचे शिक्षक तयार नाहीत. अशा स्थितीत नगर परिषदेची शिक्षण व्यवस्थाच नष्ट झाली तर नवल वाटू नये.