सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव रेंगाळला
By Admin | Updated: September 6, 2015 01:37 IST2015-09-06T01:37:05+5:302015-09-06T01:37:05+5:30
शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस विभागातर्फे गोंदिया शहराच्या चौकाचौकात सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी ...

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव रेंगाळला
सुरक्षिततेकडे दुर्लक्ष : तीन वर्षापूर्वीच आला होता निधी
गोंदिया : शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस विभागातर्फे गोंदिया शहराच्या चौकाचौकात सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सन २०१२-१३ या वर्षात दी कोटी रूपये शासनाने दिले. परंतु पैसे दिल्यानंतर कॅमेरे लावण्यासाठी टेंडर काढण्याच्या प्रक्रियेत वेळ निघाल्याने ते कॅमेरे लावण्यात आले नाही. तेव्हापासून आजपर्यंत गोंदिया शहरात कॅमेरे लावण्याच्या हालचाली पोलिस विभागाकडून झाल्या नाहीत.
गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशिल आहे. येथे गुन्हेगारीचे वाढते प्रमाण पाहून पोलीस विभागातर्फे गोंदिया शहराच्या मुख्य चौकात सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्याचा माणस पोलीस विभागाने करून तत्कालीन पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप झळके यांनी गृहखात्याला प्रस्ताव पाठवून दिड कोटी रूपये या कॅमेऱ्यांसाठी मागणी केली. ती रक्कम शासनाने सन २०१२-१३ या वर्षात दिली. परंतु शासनाने पाठविलेली रक्कम उशीरा पाठविल्यामुळे कॅमेरे लावण्याच्या प्रक्रियेला वेळच मिळाला नाही. परिणामी दुसऱ्या टेंडरनंतर मार्च महिना लोटून गेल्यामुळे सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही. निधी मिळताच पहिला टेंडर पोलिस विभागातर्फे करण्यात आला. परंतु पहिल्या टेंडरमध्ये एकाच व्यक्तीने टेंडर टाकले होते.
कमीत कमी तीन लोकांचे टेंडर येणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. दुसऱ्यांदा पोलीस विभागाने टेंडर केले. परंतु तेव्हापर्यंत वेळच निघून गेल्याने पोलिसांना त्यावर्षी सिसिटीव्ही कॅमेरे लावता आले नाही. दुसऱ्या वर्षी ही प्रक्रिया करायला हवी होती. परंतु पोलीस विभागाच्या लिपीकांनी या संदर्भात वेळोवेळी अधिक्षकांना याबाबत माहिती न पुरविल्यामुळे मागील तीन वर्ष लोटले तरी गोंदिया शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही.
सुरक्षेच्या दृष्ट्रीने गोंदिया शहरात कॅमेरे लावणे गरजेचे होते. परंतु गोंदिया शहरात कॅमेरे लावण्यात आले नाही. आता आलेला निधी तसाच पडून आहे. नाविन्यपुर्ण योजनेतून सदर निधी देण्यात आला होता.
हे कॅमेरे लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली. नियोजन विभागाने वित्त मंत्रालयाकडे पुन्हा प्रस्ताव पाठविला आहे. मंजूरी आल्यानंतर गोंदिया शहरात कॅमेरे लावले जाणार आहेत. शहरात कॅमेरे लावले सनल्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
आमगावला जमले ते गोंदियाला का नाही?
सुरक्षेच्या दृष्ट्रीने आमगाव पोलीस ठाणे आघाडीवर आहे. शहराची सुरक्षितता कायम रहावी यासाठी तत्कालीन ठाणेदार डी.बी. मडावी यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. लोकवर्गणीतून हे कॅमेरे बसवून सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. मात्र हे काम गोंदियात पोलिसांनी जमले नाही.
पोलीस अधीक्षकांची माहिती देण्यास टाळाटाळ
या संदर्भात माहिती घेण्यासाठी पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांना दुरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी हा प्रशासनाचा भाग असल्याचे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली. अंदाजे दीट कोटी रूपये आले, त्याची कार्यवाही सुरू आहे, असे ते म्हणाले. परंतु या संदर्भात सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.