अतिक्रमणास ग्रा.पं.चे प्रोत्साहन
By Admin | Updated: November 18, 2014 22:58 IST2014-11-18T22:58:35+5:302014-11-18T22:58:35+5:30
येथील वॉर्ड-५ मध्ये आमराई व मुलांच्या खेळण्याकरिता असलेल्या जागेवर ग्रामपंचायतची मालकी आहे. या जागेवर काही अतिक्रमणधारकांनी कब्जा केला असून यासाठी ग्रामपंचायतची मूकसंमती आहे.

अतिक्रमणास ग्रा.पं.चे प्रोत्साहन
अर्जुनी/मोरगाव : येथील वॉर्ड-५ मध्ये आमराई व मुलांच्या खेळण्याकरिता असलेल्या जागेवर ग्रामपंचायतची मालकी आहे. या जागेवर काही अतिक्रमणधारकांनी कब्जा केला असून यासाठी ग्रामपंचायतची मूकसंमती आहे. हे अतिक्रमण ताबडतोब काढून गावकऱ्यांसाठी ही जागा मोकळी करून देण्याची मागणी माजी उपसरपंच नामदेव चांदेवार व परशुराम शेंडे यांनी केली आहे.
ग्रामपंचायतच्या मालकीची भूमापन क्रमांक ६० ची जागा खुली व पडीत होती. याठिकाणी दूरदर्शन टॉवरकरिता ग्रामपंचायततर्फे कार्यालय बांधकाम झाले. या व्यतिरीक्त काही लोकांचे अतिक्रमण आहे. यासंबधाने २४ फेब्रुवारी रोजी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांच्या उपस्थितीत विशेष मासिक सभा घेण्यात आली. यात गट क्र. ६० च्या ग्रामपंचायत जागेवर सरहद भिंत बांधकामाविषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी या गटातील ०.६१ आर जागेवर असलेले अतिक्रमण सोडून सरहद भिंत बांधकामाचा ठराव घेण्यात आला. तर पश्चिम दिशेकडील अतिक्रमणधारक सदाशिव पुरोहित व ओम राठी यांच्या घरापासून ग्रा.पं. मालकीची पाच फूट जागा सोडून बांधकाम करावे, असा ठराव घेऊन सरहद भिंतीचे बांधकाम करण्यात आले. अगदी याच पध्दतीने हे बांधकाम झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रा.पं. सदस्यांनी हा ठराव घेतला असला तरी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या ठरावात विरोध दर्शविणे आवश्यक होते. मात्र असा विरोध झाला नाही. यात बरीच मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.
यासंदर्भात तक्रारकर्त्यांनी खंड विकास अधिकारी व सरपंच यांना सिमांकनाबाबतच्या दस्तावेजांची माहिती पटवून दिली. मात्र अद्यापही यावर कसलाच तोडगा काढण्यात आला नाही. अर्जुनी/मोरगाव ग्रामपंचायततर्फे या तऱ्हेने जागा दिली जात असेल तर गाववासीयांनी या गटात उर्वरित रिकाम्या जागेवर अतिक्रमण करून रितसर ग्रामपंचायतकडे अर्ज करण्याचे आवाहन तक्रारकर्त्यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त नागपूर, खासदार व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)