जिल्ह्यात धानाचे उत्पादन अस्थिर
By Admin | Updated: December 2, 2014 23:08 IST2014-12-02T23:08:40+5:302014-12-02T23:08:40+5:30
धानासाठी जिल्ह्याची दूरवर ख्याती असली तरिही या धानासाठी घ्यावी लागणारी जोखमी मात्र त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे. शेती हा प्रकारच निसर्गावर अवलंबून असला तरी यात खरिपाचा

जिल्ह्यात धानाचे उत्पादन अस्थिर
गोंदिया : धानासाठी जिल्ह्याची दूरवर ख्याती असली तरिही या धानासाठी घ्यावी लागणारी जोखमी मात्र त्या शेतकऱ्यालाच माहिती आहे. शेती हा प्रकारच निसर्गावर अवलंबून असला तरी यात खरिपाचा हंगाम म्हटला तर जोखीम दुतर्फा असते. यामुळेच शेतकऱ्यांचा कल अन्य पिकांकडे वाढत चालला आहे. परिणामी धान लागवडीचे क्षेत्र व त्यामुळे उत्पादनही बदलत चालले आहे. हाच निष्कर्ष कृषी विभागाकडे असलेल्या खरिपाच्या आकडेवारीनरून दिसून येत आहे. यामुळेच धानाच्या जिल्ह्यातच धानाचे उत्पादन अस्थिर असल्याचे दिसून येत आहे.
नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने प्रत्येकच क्षेत्रात आज क्रांती झाली आहे. रोवणी पासून तर पिकांची कापणी व मळणी करिता मानवाने यंत्र तयार केले आहेत. एवढी ही प्रगती झाली असली तरी या सर्वांवर निसर्गच सर्व शक्तीमान आहे आणि हे निसर्ग दरवर्षी दाखवून देते. त्याचे असे की, धान उत्पादनासाठी जिल्हा नावाजलेला आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ख्याती आहे. मात्र धानासाठी घ्यावी लागणारी मेहनत व त्यामागची जोखीम ही बाब केवळ तो शेतकरी जाणतो. धानासाठी पोषक वातावरण असल्यामुळे शेतकरी रबी व खरिप दोन्ही हंगामाता धानच जास्त प्रमाणात काढतो. यात रबी हंगाम तर सिंचनाच्या माध्यमातून निघतो. मात्र शेतकऱ्यांची खरी परिक्षा असते ती खरिपात.
त्याचे असे की, खरिपाचा हंगाम पावसावर घेतला जातो. या हंगामात पाऊस नाही पडला तर शेतकरी फसतो व पाऊस जास्त पडला तरी शेतकरी फसतो. पावसामुळे धानाचे उत्पादन घटते व वाढते. यामुळेच शेतकऱ्यांचा कल आता अन्य पिकांकडे वळत चालला आहे. परिणामी जिल्ह्यात धान लागवडीचे क्षेत्र दरवर्षी कमी-जास्त होत असल्याचे दिसते. तर याचा प्रभाव धान उत्पादनावर पडत असून त्याचा आलेखही बदलताच दिसून येतो. निसर्गाचा यात मोठा प्रभाव जाणवत असून निसर्गाच्या किमयेवरच धान उत्पादनाचा हा खेळ सुरू असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीतून दिसून येतो.
प्राप्त आकडेवारीनुसार, सन २०१०-११ मध्ये खरिपात एक लाख ८८हजार ८२६ हेक्टर क्षेत्रात चार लाख ७२ हजार४८३ मेट्रीक टन धानाचे उत्पादन झाले होते. सन २०११-१२ मध्ये हे क्षेत्र घटून एक लाख ८१ हजार ८६७ हेक्टरवर आले व उत्पादन चार लाख ४९ हजार ३१७ मेट्रीक टन झाले. सन २०१२-१३ मध्ये पुन्हा एक लाख ८८ हजार ८७० हेक्टर क्षेत्रात पाच लाख ३० हजार ७५० मेट्रीक टन उत्पादन घेण्यात आले. सन २०१३-१४ मध्ये एक लाख ८७ हजार ८५० हेक्टर क्षेत्रात चार लाख २४ हजार १५९ मेट्रीक टन धानाचे उत्पादन घेण्यात आले. तर यंदा क्षेत्र वाढले असून एक लाख ८८ हजार ९७६ पाच लाख मेट्रीक टन धान उत्पादनाचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
एकंदर दरवर्षी लागवड क्षेत्र व उत्पादन बदलत चालल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यात मागील वर्षी आलेल्या अतिवृष्टीमुळे धानाचे उत्पादन अन्य वर्षांच्या तुलनेत कमी झाल्याचेही दिसून येते.