अडीच एकरात साडेनऊ लाखांच्या केळींचे उत्पादन
By Admin | Updated: November 10, 2015 02:36 IST2015-11-10T02:36:25+5:302015-11-10T02:36:25+5:30
देशाची आर्थिक व्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी बांधवांनी शेतीला आपले दैवत समजून शेतीवर निस्सीम प्रेम करावे.

अडीच एकरात साडेनऊ लाखांच्या केळींचे उत्पादन
पीक पद्धतीत बदल : कृषी अधिकारी तुमडाम यांचे मार्गदर्शन, कृषी विभागाची शिवार फेरी
अरमचंद ठवरे बोंडगावदेवी
देशाची आर्थिक व्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी बांधवांनी शेतीला आपले दैवत समजून शेतीवर निस्सीम प्रेम करावे. शेतीला आवश्यक पोषक वातावरण निर्मितीसाठी तसेच नवनवीन पिकांचे उत्पादन घेण्यासाठी बळीराजाने वेळोवेळी आमच्या कृषी विभागाचा सल्ला घ्यावा. पारंपरिक शेती करण्याच्या पद्धतीला बगल देऊन अंशत: पीक पद्धतीमध्ये बदल करुन शेतीमधून नगदी उत्पन्न देणारे पीक घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवार फेरीदरम्यान बोंडगाव, सुरबन, मालकनपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतामधील लावण्यात आलेल्या केळीची बाग, सिमला मिर्ची, भाजीपाला, फळांचे निरीक्षण करताना उपस्थित शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करीत होते.
तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शिवार फेरीत नवेगावबांधचे मंडळ कृषी अधिकारी रामटेके, कृषी पर्यवेक्षक बी.टी. राऊत, एम.बी. ठाकूर, कृषी सहायक पवन काळे आदींचा समावेश होता. तालुक्यातील बोंडगाव-सुरबन येथील प्रगतीशील शेतकरी योगिराज हलमारे यांच्या केळीच्या बागेला भेट देऊन केळींचे उत्पादन व झाडांचे निरीक्षक कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.
योगिराज हलमारे या जागरूक शेतकऱ्याने धानाचे पीक न घेता कृषी विभागाच्या योग्य मार्गदर्शनाने केळीचे उत्पादन घेण्याचे ठरविले. अडीच एकर शेतीमध्ये तीन हजार ५०० केळीच्या झाडांची लागवड नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी केली. ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये बागेतील संपूर्ण झाडांना केळाचे फळ लागलेले आहेत. एका झाडाला सरासरी २५ ते ३० किलो वजनाचे घड लावलेले दिसून येत आहेत.
केळीच्या बागेमधून सदर शेतकऱ्याला एका झाडापासून २७५ रुपयांचे नगदी उत्पन्न मिळणार आहे. बागेतील तीन हजार ५०० झाडांपासून ९ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. शेतामधूनच ११ रुपये प्रतिकिलोच्या भावाने केळीची विक्री सुरू आहे. अडीच एकरामध्ये केळीच्या बागेची लागवड करण्यासाठी त्या शेतकऱ्यास २.५० लाखांचा खर्च आल्याचे सांगण्यात आले. धानाचे पीक सोडून केळीचे उत्पादन घेणाऱ्या योगिराज हलमारे या शेतकऱ्यास पहिल्यावर्षी शुद्ध १२ हजार ५०० रुपयांचा नफा मिळणार आहे. केळीच्या एका झाडापासून त्या शेतकऱ्यास तीन वर्षे उत्पन्न मिळणार आहे.
केळीची बाग लावण्यासाठी हेक्टरी ४५ हजाराचे अनुदान तसेच ठिंबक सिंचनाकरिता ५० हजारांचे अनुदान कृषी विभागाच्या वतीने देण्यात आल्याचे तुमडाम यांनी सांगितले. मागील वर्षी ७.६२ आर.मध्ये शेतकऱ्यांनी केळीच्या बागा लावल्या होत्या. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १५ हेक्टरमध्ये केळीच्या बागा लावण्याचे नियोजन केले आहे. सुरबन, बोंडगाव, गोठणगाव, गांभारी इत्यादी ठिकाणी १२ शेतकऱ्यांनी शेडनेट तयार केले आहे. त्यात शिमला मिर्ची, भाजीपाला असे नगदी उत्पन्न देणारे पीक शेतकरी बंधू घेत आहेत. तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या मनातील नैराश्य सोडून अंशत: पीक पद्धतीत बदल करुन शासनाच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने धानाव्यतिरिक्त केळी, मका, शिमला मिर्ची, कारले, हळद, वांगे, अद्रक, आंबा यासारखी नगदी उत्पन्न देणारी पिके घेण्याचा दृष्टीकोण अंगी बाळगल्यास शेतकऱ्यांच्या दारामध्ये सुख, शांती तसेच लक्ष्मी निश्चितच नांदेल, असा आशावाद तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी शिवार फेरी दरम्यान शेतकऱ्यांची हितगूज साधून व्यक्त केला.
याप्रसंगी परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.