घरामागील परसबागेतच घेतले १० क्विंटल आंब्याचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:56+5:302021-04-25T04:28:56+5:30
गोंदिया : विद्यार्थी घडविण्याच्या भूमिकेबरोबर पक्ष्यांचे संवर्धन जोपासण्याचा छंद, सोबतच घरामागील परसबागेत चक्क आंब्याची बाग फुलवून १० क्विंटल आंब्याचे ...

घरामागील परसबागेतच घेतले १० क्विंटल आंब्याचे उत्पादन
गोंदिया : विद्यार्थी घडविण्याच्या भूमिकेबरोबर पक्ष्यांचे संवर्धन जोपासण्याचा छंद, सोबतच घरामागील परसबागेत चक्क आंब्याची बाग फुलवून १० क्विंटल आंब्याचे उत्पादन घेतले आहे. या आंब्याच्या परसबागेत असलेल्या ३८ झाडांपासून चक्क १० क्विंटल आंब्याचे उत्पादन घेऊन भजेपार येथील शिक्षकाने आदर्श ठेवला आहे.
मुळातच निसर्गप्रेमी असलेले आमगाव तालुक्यातील भजेपार येथील रहिवासी व भोसा शाळेत कार्यरत असलेले शिक्षक जैपाल ठाकूर यांनी आपल्या घरामागच्या पसरबागेत आंब्याच्या विविध प्रजातीची ३८ लाडे लावली आहेत. दोन मोठी तर ३६ झाडे लहान आहेत. त्यांनी स्वत: तयार केलेली रोपटे लावली होती. सहा वर्षांपूर्वी लावलेली ही आंब्याची झाडे आता भरघोस उत्पादन देऊ लागली आहेत. पाच-पाच फुटांवर लावलेली ही झाडे आता फळे देऊ लागली आहेत. या झाडांपासून १० क्विंटल आंब्याचे उत्पादन निघाले आहे. देशी आंब्यासह विविध जातीच्या आंब्याची झाडे त्यांनी लावली आहेत.
बॉक्स
पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी बागेतच पाणपोई
उन्हाच्या दाहकतेपासून पक्ष्यांचा बचाव व्हावा यासाठी त्यांनी परसबागेतील झाडांवर पक्ष्यांसाठी पाणपोई तयार केली आहे. दररोज या पाणपाेईत नवीन पाणी टाकून ते पक्ष्यांची तहान भागवितात. पक्षी संवर्धनाचा त्यांचा छंद असल्याने आमगाव परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात त्यांना पक्षी मित्र म्हणून जैपाल ठाकूर यांना ओळखले जाते. त्यांनी मध्य प्रदेशातून आणलेल्या लव्ह बर्डस्चेही संवर्धन केले आहे.
बॉक्स
सागवनाचे संवर्धन
आपल्या शेतात त्यांनी शेकडो सागवनाची झाडे लावली आहेत. सागवनाच्या झाडाला अधिक असलेली मागणी पाहून त्यांची स्वत: तयार केलेली सागवनाची रोपटी आपल्या शेतात लावली आहेत. त्या सागवनाच्या रोपट्यांचे रूपांतर आता मोठ्या वृक्षांमध्ये होत आहे.