विजेच्या कमी दाबाची समस्या सुटणार
By Admin | Updated: April 8, 2017 00:44 IST2017-04-08T00:44:02+5:302017-04-08T00:44:02+5:30
सततच्या नापिकी व दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी विजेच्या कमी दाबाचा जबरदस्त शॉक लागला आहे.

विजेच्या कमी दाबाची समस्या सुटणार
एस.एम.वाकडे : शेतकऱ्यांना दिलासा
शेंडा (कोयलारी) : सततच्या नापिकी व दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी विजेच्या कमी दाबाचा जबरदस्त शॉक लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पीक बऱ्याच अंशी नष्ट झाले आहे. अशातच ९ एप्रिलपासून पूर्ववत विजेचा पुरवठा केला जाईल असे आश्वासन उपविभागीय अभियंता एस.एम. वाकडे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
कर्जाचा बोजा व दुष्काळाच्या हानीतून बाहेर पडण्यासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली. मात्र धान निसव्यावर येताना विजेच्या कमी दाबाने मोटारी सुरुच होत नाही. त्यामुळे धान पीक नष्ट होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार वीज विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन धानपिकाची समस्या मांडली. यावर तांत्रीक अडचण समोर करुन हात वर करण्यात आले.
याची दखल घेऊन जि.प. सदस्य सरिता कापगते, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उषा शहारे, विलास कापगते, पुतळीचे उपसरपंच कापगते, हेमराज कापगते, शेंड्याचे उपसरपंच छत्रपाल परतेकी, ग्रा.पं.सदस्य पुस्तोडे व शेकडो शेतकऱ्यांनी आधी कनिष्ठ अभियंता टेंभुर्णीकर व नंतर उपविभागीय अभियंता वाकडे यांच्याशी या समस्येवर चर्चा केली. यावर ९ एप्रिल पासून पूर्ववत विजेचा पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन अभियंता वाकडे यांनी शेतकऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले.
तर भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता कनिष्ठ अभियंता टेंभुर्णीकर यांनी डोंगरगाव, सालेधारणी व खुर्शीॅपार ही गावे डुग्गीपार फिडरवर टाकले आहेत. तसेच देवरी विभागातील २० गावे ककोडी फिडरवर टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
शेंडा परिसरातील सर्वच गावांना विज पुरवठा पूर्ववत सुरु होईल असे सांगीतले.(वार्ताहर)