राजीव गांधी जीवनदायी योजनेला खासगी रुग्णालयांचा ठेंगा

By Admin | Updated: August 30, 2014 01:51 IST2014-08-30T01:51:32+5:302014-08-30T01:51:32+5:30

शासनाच्या महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ खासगी रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या रुग्णांना होतच नाही.

The private hospitals will get the Rajiv Gandhi Jeevandayi Yojana | राजीव गांधी जीवनदायी योजनेला खासगी रुग्णालयांचा ठेंगा

राजीव गांधी जीवनदायी योजनेला खासगी रुग्णालयांचा ठेंगा

गोंदिया : शासनाच्या महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ खासगी रुग्णालयांमध्ये जाणाऱ्या रुग्णांना होतच नाही. गोंदियात एका रुग्णालयाने चक्क या योजनेचे बिल थकीत असल्यामुळे या योजनेतून उपचार केले जाणार नाही, असा बोर्ड लावला आहे. त्यामुळे तेथे जाणाऱ्या रूग्न आल्यापावली परत जात असल्याच्या घटना होत आहेत.
राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत एकूण ९७२ रोगांवर उपचार केले जाते. पाच हजार रूपये ते दीड लाख रूपयांपर्यंतचा मोफत उपचार या योजनेतून केला जातो. गोरगरीब जनतेजवळ मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी पैसा नसतो. त्यामुळे शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शुभारंभ करून गरीबांना आजारांवर मोफत उपचार करून देण्याची संधी दिली. मात्र शासनाकडून निधी मिळत नसल्याचे सांगून खासगी रूग्णांलयांनी चक्क राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार केला जाणार नाही, असे बोर्डच आपल्या रूग्णालयात लावले आहे. त्यामुळे गरीब रूग्णांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील रूग्णांवर राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत मोफत उपचार करण्यासाठी शासनाने गोंदिया शहरातील पाच रूग्णांलयांचा अंतर्भाव केलेला आहे. यात दोन शासकीय तर तीन खासगी रूग्णालयांचा समावेश आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालय या दोन शासकीय तर सेंट्रल हॉस्पिटल व इतर दोन खासगी रूग्णालयात या योजनेंतर्गत उपचार केला जातो. शासकीय रूग्णालयात मोठ्या आजारांवर उपचार करण्याची व्यवस्था व तांत्रिक कौशल्य तोकडे आहेत. त्यामुळे काही रूग्ण खासगी रूग्णालयात असलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या कॅबिनमधील आरोग्य मित्रांकडे आपले रेशन कार्ड नेवून नोंदणी करून घेतात. मात्र खासगी रूग्णालयांनी शासनाकडून निधी मिळत नसल्याचे सांगून त्यांना आता ठेंगा दाखविला आहे.
गोंदिया शहरातील डॉ. एल.एल. बजाज यांच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ‘राजीव गांधी योजना के अंतर्गत बिल न मिलने के कारण यह सुविधा बंद कर दी गई हैं’ असा बोर्ड आरोग्य मित्राच्या केबिनवरील भिंतीवर लावण्यात आला आहे. त्यामुळे रूग्णांना सदर योजनेंतर्गत आता या रूग्णालयात उपचार केला जात नाही, असे वाटून ते आल्यापावली परत जात आहेत.
याबाबत सेंट्रल हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी वेणीशंकर चन्ने यांच्याशी बातचित केली असता त्यांनी सांगितले की, गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी शासनाने काही रूग्णांच्या बिलाचा भरणा केलेला आहे. मात्र अद्यापही दोन ते तीन रूग्णांच्या उपचाराचे बिल मिळालेले नाही. त्यामुळेच राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत सेंट्रल हॉस्पिटलमध्ये सेवा बंद करण्यात आल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे.
तरीपण या योजनेंतर्गत औषधोपचारासाठी कुणी रूग्ण आला तर त्याला परत न पाठविता उपचार केला जातो असे ते म्हणाले. परंतू प्रत्यक्षात या योजनेतून उपचार होत नसल्याच्या तक्रारी काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्या. रूग्णाच्या औषधोपचारानंतर २४ तासाच्या आता त्याचे बिल व इतर कागदपत्रे तयार करून मंजुरीसाठी पाठविली जातात. शासनाने एक ते दीड महिन्याच्या आत ते बिल जमा करावे, असे निर्धारित आहे. मात्र त्यासाठी शासन विलंब करीत असल्यानेच ही समस्या उद्भवत आहे. या प्रकाराबाबत राजीव गांधी जीवनदायी योजनेचे जिल्हा व्यवस्थापक पोपट यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मी सध्या सुटीवर असून बाहेरगावी आहे. त्यामुळे सध्या याबाबत काही सांगू शकत नाही, असे उत्तर दिले. (प्रतिनिधी)

Web Title: The private hospitals will get the Rajiv Gandhi Jeevandayi Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.