कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला वेळीच प्रतिबंध लावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST2021-04-09T04:31:28+5:302021-04-09T04:31:28+5:30
गोंदिया : जिल्ह्यासह गोंदिया तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट होत चालला असून, ...

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला वेळीच प्रतिबंध लावा ()
गोंदिया : जिल्ह्यासह गोंदिया तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हा तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट होत चालला असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे असून, आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आ. विनोद अग्रवाल यांनी दिले.
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. ८) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा शल्यचिकित्सक अमरिश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, वैद्यकीय अधीक्षक दिलीप गेडाम, नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी वेदप्रकाश चौरागडे उपस्थित होते. आ. अग्रवाल यांनी मागील वर्षीच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य सोयी-सुविधेत वाढ करण्याची गरज आहे. काेविड केअर सेंटर, डीसीएच सेंटरची नियमित साफसफाई आणि डॉक्टर, परिचारिका यांचा स्टाफ उपलब्ध ठेवण्यास सांगितले. अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी फुलचूर येथील तंत्रनिकेतन विद्यालयात १५० खाटांचे कोविड केअर सेंटर, क्रीडा संकुल येथे ९५ खाटा, मुर्री आश्रमशाळेत १२० खाटा, आयुर्वेदिक कॉलेज ८०, अग्रसेन भवन ७० आणि केटीएस रुग्णालयात १०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगितले. कोरोना काळात डॉक़्टर आणि आरोग्य कर्मचारी चांगले काम असल्याचे सांगत त्यांना सदैव सहकार्य करण्यास तयार असल्याचे आ. अग्रवाल यांनी सांगितले.
..........
रिक्त पदांची अडचण कायम
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची समस्या निर्माण होत असल्याची बाब डॉ. मोहबे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. ८० पैकी ५५ पदे भरली असून, २५ पदे रिक्त आहेत. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी दररोज दीड हजारावर चाचण्या केल्या जात असल्याचे सांगितले.
.............
आरएनए प्लेक्स स्ट्रक्शन मशीनची गरज
कोरोनाबाधितांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे चाचण्यासुध्दा वाढविण्याची गरज आहे. यासाठी आरएनए प्लेक्स स्ट्रक्शन मशीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाल्यास कोराेना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यास मदत होणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप गेडाम यांनी सांगितले. यावर मशीन खरेदीचा व प्लाज्मा प्रोसेस मशीनचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठविण्यास सांगितले.
..........
काेविड केअर सेंटरची संख्या वाढवा
कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्यात यावी. गणेशनगर येथील नगर परिषद शाळेत आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवण्यास आ. विनोद अग्रवाल यांनी आराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.