गोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर बुधवारी (दि.१७) पहाटेपासून अवकाळी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील हरभऱ्यासह इतर रब्बी पिकांना फटका बसला. तर धान खरेदी केंद्रावरील धान मोठ्या प्रमाणात उघड्यावर पडून असल्यामुळे अवकाळी पावसामुळे धान भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला. जिल्ह्यालगत असलेल्या लगतच्या मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात मंगळवारी अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यानंतर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा ते पाऊण तास पाऊस झाला. तर बुधवारी पहाटे सुद्धा जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे वातावरणात दिवसभर गारवा होता. तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे रब्बी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. तर मागील दोन महिन्यापासून राईस मिलर्स असोसिएशनने त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शासकीय धान खरेदी केंद्रावरुन धानाची उचल करुन त्याची भरडाई करणे बंद केले आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेला जवळपास २५ लाख क्विंटल धान उघड्यावर पडला आहे. काही धानाला ताडपत्र्या झाकून ठेवण्यात आले आहे. मात्र केंद्रावर मोठ्या प्रमाणात धान पडून असल्याने काही प्रमाणात धान ओला झाल्याची माहिती आहे. मात्र यासंदर्भात या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी अवकाळी पावसामुळे धानाचे नुकसान झाले नसल्याचे सांगितले. जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १२.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. आमगाव ११.४ मिमी, गोरेगाव १८.३ मिमी, तिरोडा ९ मिमी, सालेकसा १०.३ मिमी., देवरी ९.९ मिमी, अर्जुनी मोरगाव १०.३ मिमी, सडक अर्जुनी १६. ३ मिमी पावसाची नोंद झाली.
...................
गोदामे नसल्याने धान उघड्यावर
आदिवासी विकास महामंडळातंर्गत खरेदी करण्यात आलेले धान साठवून ठेवण्यासाठी अद्यापही गोदामांची व्यवस्था नाही. त्यामुळे या विभागाने खरेदी केलेले धान तसेच उघड्यावर ताडपत्र्या झाकून ठेवले जाते. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यंदा धान साठवून ठेवण्यासाठी २२० गोदामे बुक केली होती. पण राईस मिलर्स असोसिएशनने धानाची उचल न केल्याने गोदामे हाऊस भरली असून लाखो क्विंटल धान उघड्यावर आहे. त्यामुळे या धानाला झाकण्यासाठी पुरेशा ताडपत्र्या आणि या विभागाचे नियोजन नसल्याने धान भिजल्याची माहिती आहे. मात्र आता या दोन्ही विभागांकडून यावर पांघरुण टाकले जात आहे.