बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात प्राणीगणनेसाठी सज्ज
By Admin | Updated: May 20, 2016 01:34 IST2016-05-20T01:34:00+5:302016-05-20T01:34:00+5:30
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात विना दुर्बिन, विना कॅमेरा वन्य प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात प्राणीगणनेसाठी सज्ज
३४३ जणांचे अर्ज : २०३ कर्मचाऱ्यांसह २०३ वन्यजीव पे्रमी करणार निरीक्षण
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा बुद्ध पौर्णिमेच्या प्रकाशात विना दुर्बिन, विना कॅमेरा वन्य प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. त्यासाठी वन व वन्यजीव विभाग सज्ज झाला असून २१ मे रोजी सकाळी ९ वाजता प्राणी गणनेचा शुभारंभ होईल व त्याची सांगता २२ मे रोजी सकाळी ९ वाजता करण्यात येईल.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात नागझिरा अभयारण्य, न्यू नागझिरा अभयारण्य, कोका अभयारण्य, नवेगाव पार्क व नवेगाव अभयारण्यांचा समावेश आहे. येथील जलस्त्रोतांवर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्य प्राण्याची गणना करण्यासाठी मुंबई, नागपूर, गोंदिया यासह राज्य व राज्याबाहेरीलही वन्यजीव प्रेमींनी अर्ज केले होते. मात्र वन विभागाकडून मचानवरी जागेच्या उपलब्धतेनुसार काही वन्यप्रेमींना वगळण्यात आले तर काहींची निवड करण्यात आली आहे. त्याची माहिती त्यांच्या मोबाईवर देण्यात आली आहे.
जिल्ह्यासह राज्यभरातून एकूण ३४३ वन्यजीव प्रेमींचे अर्ज आले होते. एकूण १९२ मचानांवरून निरीक्षण करण्यात येणार असून २०३ वन्यजीव प्रेमींचे अर्ज मंजूर करण्यात आली आहेत. या २०३ वन्यजीव प्रेमींसह वन विभागाचे प्रत्येकी एक याप्रमाणे २०३ वन कर्मचारी मचानांवर उपस्थित राहणार आहेत. शिवाय वन व वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी, राऊंड आॅफिसर व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नागझिरा अभयारण्यात ५९ मचान उभारण्यात आले असून त्यावर बसण्याची क्षमता ७० वन्यजीव प्रेमींची आहे. त्यासाठी १७५ अर्ज आले होते. यापैकी ७० वन्यजीव प्रेमींच्या अर्जांना मंजुरी मिळाली असून त्यांच्यासह ७० वन विभागाचे कर्मचारी राहणार आहेत. तर न्यू नागझिरा अभयारण्यात ४१ मचान उभारण्यात आले आहेत. त्यासाठी ४१ अर्ज आले. या ४१ वन्यजीव प्रेमींसह वन, वन्यजीव विभागाचे ४१ कर्मचारी राहणार आहेत.
कोका अभयारण्यात २२ मचान तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी ५१ वन्यजीव प्रेमींचे अर्ज आले होते. यापैकी २२ जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले. या २२ वन्यजीव प्रेमींसह वन विभागाचे २२ कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
नवेगाव पार्कमध्ये ४२ मचान तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी ४६ वन्यजीव प्रेमींचे अर्ज आले होते. यापैकी चार अर्ज नामंजूर करून ४२ जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले.
या ४२ वन्यजीव प्रेमींसह ४२ वन विभागाचे कर्मचारी राहणार आहेत. तर नवेगाव अभयारण्यात २८ मचान उभारण्यात आले. त्यासाठी ३० वन्यजीव प्रेमींचे अर्ज आले होते. यापैकी २८ जणांची निवड करण्यात आली. या २८ वन्यजीव प्रेमींसह वन विभागाचे २८ कर्मचारी हजर राहणार आहेत.(प्रतिनिधी)