कामे तयार, पण मजुरांची वाणवा
By Admin | Updated: February 23, 2017 00:16 IST2017-02-23T00:16:28+5:302017-02-23T00:16:28+5:30
गोंदिया जिल्ह्याने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून यावर्षी आतापर्यंत ३ हजार ९०८ कामांवर ....

कामे तयार, पण मजुरांची वाणवा
नरेश रहिले गोंदिया
गोंदिया जिल्ह्याने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून यावर्षी आतापर्यंत ३ हजार ९०८ कामांवर २ लाख ५८ हजार ८०४ मजुरांना काम दिले आहे. त्या मजुरांनी ६३ लाख २१ हजार ४९१ दिवस काम केले आहे. जिल्ह्यातील लोकांना मागेल त्याला १०० दिवस काम देण्याची हमी शासनाने दिली आहे. त्यासाठी रोहयोची मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्यात आली, परंतु या कामांवर मजूरच येत नसल्याने आजघडीला जिल्ह्यात जॉबकार्डधारक २ लाख ५८ हजार ८५२ मजुरांपैकी केवळ ६ हजार ५११ मजूर काम करीत आहेत.
जिल्हा प्रशासनाने सान २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी २ हजार ४०७ कामे, तर मागच्या वर्षातील १ हजार ९०६ कामे असे एकूण ४ हजार ३१३ सुरू करायची होती. यातील ३ हजार ९०८ कामे पुर्ण करण्यात आली आहेत. या कामांवर जिल्ह्याच्या १ लाख २६ हजार ९८७ कुटुंबातील २ लाख ५८ हजार ८२५ मजूरांना ६३ लाख २१ हजार ४९१ दिवस काम देण्यात आले. आताही कामे सुरू आहेत. परंतु या कामावर आता मजूर येत नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या रबी पिक मोठ्या प्रमाणात काढण्यात येत असल्याने रोवणीच्या कामावर मजूर जात आहेत. मार्च महिन्यात उर्वरीत ४०५ कामे सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले. मागेल त्याला शंभर दिवस काम देण्याची शासनाची तयारी आहे परंतु मजूर कामच मागत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत ४७९ ग्राम पंचायतीअंतर्गत एकही काम सुरू नाही. गावात काम मिळत नाही म्हणून मजुरांचा गोंधळ सुरू आहे तर काम आहे पण मजूर नाहीत असा जिल्हा प्रशासनाचा कांगावा असल्यामुळे नेमके चुकते कुठे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी मजूर वर्गातून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
७२ ग्राम पंचायतींच्या कामांवर ६५११ मजूर
रोहयो चालविणाऱ्या रोजगार सेवकांनी आपापल्या मागण्यांना घेऊन १५ फेब्रुवारीपासून संप पुकारल्याने बहुतांश गावातील कामे बंद आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ४७९ ग्राम पंचायतीअंतर्गत एकही काम सुरू नाहीत. परंतु ७२ ग्राम पंचायतीअंतर्गत २१४ कामे सुरू असून त्या कामांवर ६ हजार ५११ मजूर कार्यरत आहेत.
शौचालय व घरकुलाचे अधिक काम
सद्या स्थितीत शौचालय व घरकुलाचे मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. शौचालयाची ८६ कामे सुरू असून त्या कामांवर २७५, घरकुलाच्या ५९ कामांवर २३१ मजूर, कम्पोष्ट खताची चार कामे, जमीन सपाटी करणाच्या एका कामावर २० मजूर, वृक्ष लागवडीच्या ११ कामांवर ५४ मजूर, नाला सरळीूकरणाच्या ७ कामांवर १ हजार ७३२ मजूर, शेततळीच्या एका कामावर २८ मजूर, विहीरींच्या ३ कामांवर ३४ मजूर, भातखाचरच्या ६ कामांवर १३८ मजूर, तलाव खोलीकरणाच्या १२ कामांवर २ हजार ४६५ मजूर तर पांदण रस्त्याच्या २४ कामांवर १ हजार ५२६ मजूर कार्यरत आहेत.