मंडईसाठी नाटकांची तयारी जोमात

By Admin | Updated: October 25, 2014 01:34 IST2014-10-25T01:34:46+5:302014-10-25T01:34:46+5:30

झाडीपट्टीतील गोंदिया जिल्ह्यात दिवाळीनंतर मंडई उत्सवासाठी विविध नाटक मंडळे व नाट्य कंपन्यांनी...

Preparations for play for the yard Jomat | मंडईसाठी नाटकांची तयारी जोमात

मंडईसाठी नाटकांची तयारी जोमात

गोंदिया : झाडीपट्टीतील गोंदिया जिल्ह्यात दिवाळीनंतर मंडई उत्सवासाठी विविध नाटक मंडळे व नाट्य कंपन्यांनी नाट्यप्रयोगासाठी नियोजनाची तयारी चालविली आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून मंडईनिमित्त जिल्ह्यात विविध गावांमध्ये मनोरंजनासाठी नाटकांचे आयोजन केले जाते.
झाडीपट्टीतील गोंदिया जिल्हा नाटकांच्या आयोजनाबाबत अग्रसेर आहे. इंग्रजांच्या काळापासून येथे मनोरंजनासाठी नाटकांचे आयोजन केले जाते. ती परंपरा नाट्यप्रेमींनी आजही कायम ठेवलेली आहे. यापूर्वी किंंवा स्वतंत्र मंडई व पटाच्या निमित्त नाटके सादर करीत असत. नवेगावबांध, खोडशिवनी, ताडगाव, उमरी, रेगेंपार, केशोरी ही काही गावे आजही संगीत नाटकांचे आयोजन करतात. येथे इंग्रजकालीन नाट्यप्रेमी जमीनदार व कारभारी नाटके रचून सजावट, नेपथ्य व इतर नाट्य साहित्य पुरवून पौराणिक व इतर नाटके मोठ्या थाटाने आयोजित करीत असत.
झाडीपट्टी रंगभूमी उदयास येऊन ती पूर्वजांनी टिकवून ठेवली. आजही नाटकांची ही परंपरा जिल्ह्यात कायम आहे. दिवाळीनंतर मंडई उत्सवानिमित्त व शंकरपटानिमित्त गावागावांत नाटकांचे सादरीकरण केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकाचे मनोरंजन साधले जाते. पूर्वी स्थानिक नाटक मंडळ नाटक करायचे. त्यातून मोठ्या प्रमाणात नाट्य कलाकार निर्माण झाले.
अलीकडे व्यावसायिक नाटकांना उधाण आल्याचे दिसत आहे. यानिमित्त जिल्हावासीयांना वेगवेगळ्या नाटकांतून सिने कलावंत पहावयास मिळतात. पूर्वी जिल्ह्यात प्रभाकर आंबोणे, मधू जोशी, डॉ. परशराम खुणे, राऊत गुरुजी, छगन पुस्तोडे, मीना देशपांडे, आरती जागदाळे, शोभा जोगदेव, प्रीती बोंद्रे, शशिकला भाग्यवंत, के.बी. परशुरामकर या नाट्य कलावंतांचा पौराणिक व सामाजिक नाटकांत भर दिसत होता.
आज व्यावसायिक नाटकात शेखर पटले, हिरालाल पेंटर, शेखर डोंगरे, प्रा.गहाणे, मंगेश परशुरामकर हे कलाकार व त्यांचे संच प्रामुख्याने आहेत. दिवाळीनंतर मंडईसाठी झाडीपट्टीतील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक गावांतून नाट्यप्रयोग आयोजित होत असतात.
शंकरपटापर्यंत नाटकाचा हंगाम चालत असतो. झाडीपट्टीत नाटकांना प्रेक्षकही मोठ्या प्रमाणात दाद देत असतात. यानिमित्त मंडई उत्सवादरम्यान गावातील प्रत्येक घरी पाहुणे आलेले असतात.
सध्या दिवाळीनंतरच्या मंडईसाठी कंपन्यांचे नाटक प्रयोगाच्या नियोजनाचे काम व नाटकाचे बुकिंग होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर जिल्हावासीयांना नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता येईल. त्यासाठी जिल्ह्यातील विविध नाट्य मंडळे नाट्यप्रयोग सादर करण्याच्या तयारीला लागलेली दिसत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Preparations for play for the yard Jomat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.