लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जोरात

By Admin | Updated: January 10, 2015 01:34 IST2015-01-10T01:34:18+5:302015-01-10T01:34:18+5:30

पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने १८ जानेवारी व २२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

The preparation of the second phase of vaccination is loud | लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जोरात

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जोरात

गोंदिया : पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने १८ जानेवारी व २२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील एकही मुल पोलिओ लसीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी जिल्हा समन्वय समितीच्या मोहिमेबाबत आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी हरिश कळमकर, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजीव दोडके उपस्थित होते.
डॉ.सैनी म्हणाले, पल्स पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यामध्ये आरोग्य विभागाची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. म्हणूनच एकही बालक या मोहिमेतून सुटू नये याकरिता एकजुटीने मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे.
यावेळी डॉ.रवि धकाते यांनी मोहिमेत सहभागी आरोग्य यंत्रणेबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. बुथवरील लसीकरण योजनेमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख १० हजार ५५७ बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मोहिमेतील एकूण बुथची संख्या १३८४ असून ग्रामीण भागात १२६४ व शहरी भागात १२० बुथ राहतील. या मोहिमेमध्ये ३१३९ मनुष्यबळ काय करणार असून २८९ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहे.
आयपीपीआय कृती योगनेंतर्गत बुथवरील लसीकरणानंतर ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस लसीकरण करण्यात येईल. यामध्ये सर्व क्षेत्रात पाडे, वस्त्या, विटभट्या, शेतात राहणारे मजूर, मुस्लिमवस्ती, मेंढपाळ, परप्रांतातून आलेले कुटुंबे, धाबे, शेतावरील घरे, बांधकामाची ठिकाणे, शहरालगतचा भाग, झोपडपट्या, पहिल्या दुसऱ्या मजल्यावरील घरे, ज्या भागात नकारार्थी लाभार्थ्यांचे कार्यक्षेत्र आहे, प्राथमिक लसीकरण कमी आहे अशा ठिकाणी व अशा सर्व क्षेत्रात घरोघरी लसीकरण राबविण्यात येणार आहे. मोहिम राबविण्यासाठी ग्रामीण व शहरी असे एकूण १५ लाखट ७२ हजार २६४ रुपये निधी शासनाद्वारे पुरविण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ. रवि धकाते यांनी दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर यांनी पल्स पोलिओ मोहिमेबाबत प्रस्तूतीकरण केले.
बैठकीला केटीएस रुग्णालयाचे बाह्यसंपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील, सर्व तालुका अधिकारी, नोडल अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक, शिक्षणाधिकारी, तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मेश्राम व पोलिस विभागातील अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The preparation of the second phase of vaccination is loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.