तंमुसच्या सहकार्याने प्रेमीयुगुलाचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2017 02:15 IST2017-04-13T02:15:55+5:302017-04-13T02:15:55+5:30
गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समजुतीला मान देऊन दोन्ही कुटुंबाने ताणतणाव बाजूला सारून

तंमुसच्या सहकार्याने प्रेमीयुगुलाचा विवाह
काचेवानी : गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समजुतीला मान देऊन दोन्ही कुटुंबाने ताणतणाव बाजूला सारून प्रेमीयुगुलास तंटामुक्त समितीच्या सहकार्याने विवाह बंधनात अडकविले. गावातील विठ्ठल रूख्माई व हनुमान मंदिरात संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत सदर लग्न सोहळा पार पडला.
काचेवानी (बरबसपुरा) येथील युवराज पटले यांचा मुलगा अजय (२३) व सेजगाव येथील भिकराम पारधी यांची मुलगी सीमा (२१) यांचे मागील साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या प्रकरणाची माहिती दोघांनी आपापल्या कुटुंबास दिली. यानंतर गावातील प्रतिष्ठितांना एक दुसऱ्याच्या घरी नेवून समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाहेरगावावरून अजय आल्यानंतर मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष तथा उपसरपंच पप्पू सय्यद, पोलीस पाटील प्रतिनिधी नरेंद्र रंगारी, शिक्षक नेतराम माने, ग्रा.पं. सदस्य संदीप अंबुले, मुलाचे वडील युवराज पटले, मोठे वडील जगलाल पटले व परिवारासह वधूच्या घरी जावून तेथील मान्यवरांना मुलीच्या वडिलांद्वारे पाचारण करण्यात आले. सेजगाव तंमुसचे अध्यक्ष कन्हैयालाल उचलकर, सचिव अशोक बळगे, पं.स. उपसभापती डॉ. किशोर पारधी, माजी सभापती प्रभूदास सोनेवाने, रामचंद्र पारधी यांच्यासह २० ते २५ नागरिक मुलीच्या वडिलांच्या घरी गेले. घरी सभा घेण्यात आली. दोन्ही पक्षाचे कुटुंब व प्रेमीयुगल अजय व सीमा यांच्याबाबत चर्चा करण्यात आली. काही अडचणी निर्माण होत असताना दोन्ही गावच्या लोकांनी समजूत घातली. दोन्ही पक्षाने स्वीकृती दिली. यानंतर ग्रामस्थांनी व तंमुसने कार्यवाही पार पाडली. त्यानंतर सेजगावटोला येथे हनुमान व विठ्ठल रूख्माई मंदिरात विधिवत लग्न सोहळा पार पडला.