वीज अभियंता जाणार ६ सप्टेंबरपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST2021-08-24T04:33:01+5:302021-08-24T04:33:01+5:30
गोंदिया : प्रलंबित मागण्यांना घेऊन कित्येकदा प्रशासनासोबत चर्चा करूनही प्रशासन उदासीन असून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता महावितरण, महापारेषण ...

वीज अभियंता जाणार ६ सप्टेंबरपासून संपावर
गोंदिया : प्रलंबित मागण्यांना घेऊन कित्येकदा प्रशासनासोबत चर्चा करूनही प्रशासन उदासीन असून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील अभियंता ६ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा निर्णय सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनने घेतला आहे.
सध्या सुरू असलेला कोरोना प्रादुर्भाव असो की, वादळ व पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती राज्यातील वीज ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देण्यासाठी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज क्षेत्रात काम करणारे अभियंता नेहमीच तत्पर असतात. आपल्या जीवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. एवढेच नव्हे तर कंपनीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वीज बिल वसुलीसाठीही ते झटत आहेत. असे असतानाही त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तिन्ही कंपन्यांचे प्रशासन उदासीन आहे. प्रलंबित मागण्यांसाठी कित्येकदा कंपनी प्रशासनासोबत चर्चा करूनही प्रशासनाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने मात्र आता अभियंत्यांमध्ये प्रशासनाला घेऊन रोष व्याप्त आहे.
..........
या आहेत असोसिएशनच्या मागण्या
महावितरण कंपनीतील आवश्यक रिक्त पदे ही संकल्पना रद्द करा, तिन्ही कंपन्यांतील अभियंत्यांची पदोन्नती करा, महानिर्मिती कंपनीतील एकतर्फी बदली धोरण व फॅक्टरी अलाऊंस लागू करू नये, संघटनेला विश्वासात न घेता प्रशासनातर्फे नवीन भरती धोरण व सेवा विनियम एकतर्फी लागू करू नये, वीज बिल वसुलीबाबत प्रशासनातर्फे चालविलेल्या दबाव तंत्रामुळे व त्यामुळे वाढलेले मारहाणीचे प्रकार बघता लोकसेवकाचा दर्जा द्यावा आदी असोसिएशनच्या मागण्या आहेत.
.......
५०७ उपकार्यकारी अभियंत्यांची पदे रिक्त होणार
विशेष म्हणजे, स्टाफ सेटअपच्या नावावर अभियंत्यांची पदे कमी करण्याचा प्रयत्न सुरू असून १५ जूनपासून स्टाफ सेटअप लागू करून परिमंडळ स्तरावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे ५०७ उपकार्यकारी अभियंता व १४० अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांची पदे कमी होणार आहेत. अशात आता सबॉ र्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनने संपाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला असून ६ सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.