वीज मंडळाचा भोंगळ कारभार
By Admin | Updated: November 2, 2015 01:30 IST2015-11-02T01:30:50+5:302015-11-02T01:30:50+5:30
येथील सर्व विज ग्राहकांना सप्टेंबर-आॅक्टोंबर महिन्याचे वीज बिलात मागील महिन्याच्या वीज बिलाची रक्कम जोडून आली.

वीज मंडळाचा भोंगळ कारभार
ग्राहकांना मनस्ताप : मागील बिल जोडून पाठविले बिल
दिघोरी/मोठी : येथील सर्व विज ग्राहकांना सप्टेंबर-आॅक्टोंबर महिन्याचे वीज बिलात मागील महिन्याच्या वीज बिलाची रक्कम जोडून आली. मागील महिन्यात भरलेली रक्कम कशी लागून आली असा प्रश्न सर्व वीज ग्राहकांना पडला आहे. परिणामी वीज विभागाचा अजब कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
दिघोरी/मोठी येथे डोंगरगाव विज उपकेंद्रातून विजेचा पुरवठा होत असतो. त्यामुळे विजेची रिडींग तथा देखभाल संपूर्ण डोंगरगाव उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी बघत असतात. दिघोरीतील किमान ८० टक्के वीज ग्राहाकंनी मागील महिन्याचे विज बिल भरले असताना सुध्दा या महिन्याचे बिलात मागील थकबाकी म्हणून जोडून देण्यात आले आहे. त्यामुळे येथील बँकेत वीज बिलाचा भरणा करावयाचा असल्यास संपूर्ण बिलच भरावे लागते.
त्यामुळे ग्राहकांना खूप मनस्ताप झाला आहे. मागील बिल भरले असल्याची पावती दाखविल्यावर सुध्दा वीज बिल बँकेत स्विकारले जात नसल्याने ग्राहकांना डोंगरगाव उपकेंद्रात जावून वीज बिल कमी करुन आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे डोंगरगाव येथे वेळ काढून जाणे-येणे करणे यासाठी ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सुध्दा सहन करावा लागत आहे. त्यामुळे डोंगरगाव उपकेंद्रातील अधिकाऱ्यांनी स्वत: दिघोरीत कँप लावून दिघोरीतच विजबिल कमि करुन दयावे त्यामुळे विज ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार नाही.
दिघोरीतच शिबिर लावून वीजेचे बिल कमी करुन दिल्यास विज मंडळाविरुध्द ग्राहकांमध्ये असलेला असंतोष कमी होण्यास मदत होईल, अशी परिसरात चर्चा आहे. (वार्ताहर)