उखडलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य
By Admin | Updated: October 22, 2014 23:20 IST2014-10-22T23:20:30+5:302014-10-22T23:20:30+5:30
तिरोडा शहर अदानी पॉवर महाराष्ट्र लि.मुळे सर्वदूर सुपरिचित झाले आहे. येथील रेल्वे स्थानक व रेल्वे पथवाहिन्यांमुळे या तालुक्याची विभागणी दोन भागात झालेली आहे. तिरोडा शहराच्या खैरलांजी

उखडलेल्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य
गोंदिया : तिरोडा शहर अदानी पॉवर महाराष्ट्र लि.मुळे सर्वदूर सुपरिचित झाले आहे. येथील रेल्वे स्थानक व रेल्वे पथवाहिन्यांमुळे या तालुक्याची विभागणी दोन भागात झालेली आहे. तिरोडा शहराच्या खैरलांजी मार्गावर तालुक्यातील अर्धी गावे वसलेली आहेत. या गावांतील नागरिक आपल्या विविध कामांसाठी तिरोडा शहरालगत असलेल्या चिरेखनी गावातून रामसागर मार्गे तहसील कार्यालय व पंचायत समितीमध्ये जातात. मात्र जिल्हा परिषदेंतर्गत येणारा रस्ता खड्ड्यात पूर्णपणे हरविल्याने तालुक्यातील अर्ध्याधिक गावांतील नागरिकांना मोठाच त्रास सहन करावा लागत आहे.
या खड्डेमय रस्त्याच्या बांधकामाकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. तिरोडा तहसील कार्यालयाजवळच उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तिरोडा रेल्वे स्थानक आहे. शहरापासून खैरलांजी (बालाघाट) रस्त्यावरील अनेक गावांतील नागरिक आपल्या विविध कामांसाठी या कार्यालयांत व रेल्वे स्थानकात याच मार्गाने ये-जा करतात. मात्र या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे वाहन चालविणे तर दूर पायी चालणेसुद्धा अत्यंत कठिण होवून गेले आहे. वाहन चालकाने एक खड्डा जरी वाचविण्याचा प्रयत्न केला तर वाहन दुसऱ्या खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे अनेकदा येथे लहान-मोठे अपघातही घडले आहेत.
या रस्त्याच्या दयनिय अवस्थेमुळे केवळ एकाच गावातील नागरिकांना त्रास होत नाही, तर तालुक्यातील जवळपास अर्ध्याधिक गावांतील नागरिकांना त्रास होतो. तिरोडा खैरलांजी मार्गावरील चिरेखनी, भुराटोला, पालडोंगरी, पुजारीटोला, करटी बु., इंदोरा बु., विहिरीया, बघोली, अर्जुनी तसेच यानंतर धापेवाडा मार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील परसवाडा, गोंडमोहाळी, बोदा, अत्री, सोनेगाव, डब्बेटोला, जमुनिया आदी अनेक गावातील नागरिक या चिरेखनी-रामसागर मार्गे दररोज सकाळ ते सायंकाळपर्यंत रेल्वे स्थानक व तहसील कार्यालयासह अनेक कार्यालयांत ये-जा करतात. मात्र हा रस्ताच खड्ड्यात हरविल्याने त्यांना ये-जा करण्यासाठी मोठाच त्रास होतो. उल्लेखनिय म्हणजे हा रस्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे की, या मार्गावरून कोणतेही आॅटो किंवा काळी-पिवळीधारक आपले वाहन नेत नाही.
सद्यस्थितीत या रस्त्यावरील ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. वाहन चालकाने कितीही कसोशीने येथून वाहन चालविण्याचा प्रयत्न केला तरी वाहन खड्ड्यात गेल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे खड्ड्यातील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडतो. या प्रकारामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांमध्ये वाद वाढून एकमेकांना शिवीगाळ केली जाते.
कधी-कधी या भांडणाचे रूपांतर मारहाणीतही होते. तर कधी वाहनांमुळे अंगावर उडालेल्या चिखलामुळे त्या वाहन धारकाचा पाठलाग करून त्याला गाठले जाते व चांगलाच चोप दिला जातो. या सर्व समस्या केवळ त्या रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे उद्भवतात.
मागील १० ते १२ वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्याची साधी डागडुजी करण्यात आली नाही. सुधारणा म्हणून खड्ड्यांमध्ये साधे मुरूमदेखील घालण्यात आले नाही. या रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. रस्त्याच्या मधोमध खड्डे तर आहेतच, पण रस्त्याच्या दोन्ही बाजू पूर्णपणे उखडून डबरे तयार झालीत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहन चालविणे कठिण झाले आहे.
खैरलांजी मार्गावरून चिरेखनीचे प्रवेशद्वार ते नालंदा बुद्धविहारपर्यंतचा रस्ता केवळ काही प्रमाणात चांगला आहे. त्यानंतरच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य आहे. यानंतर चिरेखनी ग्रामपंचायत ते रामसागरपर्यंतचा रस्ता अत्यंत खड्डेमय व पूर्णत: डांबरीकरण उडलेल्या स्थितीत आहे. रामसागर ते तिरोडा तहसील कार्यालयापर्यंत थोड्या-थोड्या अंतरावर मोठाले खड्डे असून त्यात घाण पाणी साचले आहे. (प्रतिनिधी)