मोबाईल अॅपसाठी ‘पोस्टर पब्लिसिटी’
By Admin | Updated: September 5, 2016 00:15 IST2016-09-05T00:15:11+5:302016-09-05T00:15:11+5:30
वीज ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा देता यावी यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने मोबाईल अॅप लॉँच केले आहे

मोबाईल अॅपसाठी ‘पोस्टर पब्लिसिटी’
वीज ग्राहकांची सुविधा : महावितरण लावणार २१०० पोस्टर्स
गोंदिया : वीज ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा देता यावी यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने मोबाईल अॅप लॉँच केले आहे. या अॅपद्वारे ग्राहकांना एका क्लीकवरून घरी बसल्या नानाविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांत माहिती व जागृती आलेली नाही. त्यामुळेच या मोबाईल अॅपच्या प्रचारासाठी महावितरणकडून ‘पोस्टर पब्लिसिटीचा’ नवा फंडा अंमलात आणला जाणार आहे. यात २१०० पोस्टर्स महावितरणकडून सार्वजनिक ठिकाणी लावले जाणार आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच वेळेची कमतरता भासत आहे. त्यात वीज बील भरणे, तक्रार, नवे कनेक्शन यासाठी नागरिकांना रांगेत उभे राहणे व कार्यालयाच्या चकरा मारण्यासाठी वेळ नाही. नागरिकांची वेळेची ही समस्या लक्षात सर्वच विभाग व क्षेत्रांत लॅटेस्ट तंत्रज्ञान आणले जात आहे. त्यात मोबाईल ही आज सर्वांचीच मुलभूत गरजच बनली आहे.
या मोबाईलवरूनच आज नागरिक अपली सर्व काम आटोपून घेत आहेत. विशेष म्हणजे बँका मोबाईलचा चांगलाच उपयोग करून घेत आहेत. ही बाब हेरून महावितरणने आपल्या ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल अॅप लॉँच केले आहे. या अॅपचा वापर करून नागरिक वीज बील भरणा, सेवा तक्रारी, नवीन वीज जोडणी अर्ज करू शकतील.
विशेष म्हणजे वीज बील भरणे सहज शक्य झाल्याने हे अॅप लोकप्रीय ठरले आहे. मात्र गोंदिया व भंडारा जिल्ह्यात या अॅपबाबत नागरिकांना माहिती झालेली नाही.
करिता या अॅपच्या प्रचारार्थ महावितरणकडून ‘पोस्टर पब्लिसिटी’ केली जाणार आहे. यात महावितरणकडून २१०० पोस्टर्स गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणांसह महावितरणच्या विभागीय, उपविभागीय व शाखा कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद कार्यालयात लावले जाणार आहेत. शिवाय रेडिओ जिंगल्सचा वापर करूनही प्रचार केला जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)
राज्यात साडेचार लाख लोकांनी केले डाऊनलोड
महावितरणचे हे अॅप राज्यात चार लाख ५५ हजार ६४६ लोकांनी डाऊनलोड केले आहेत. गुगल प्ले स्टोर्स, अॅपल अॅप स्टोर्स व विंडो स्टोर्स वरून हे अॅप डाऊनलोड करता येते. ग्राहक तसेच वीज कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हे मोबाईल अॅप विकसीत करण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करावा असे आवाहन गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता बी.के.जनवीर यांनी केले आहे.