सत्तेसाठी फाटाफुटीचे राजकारण
By Admin | Updated: July 26, 2016 01:32 IST2016-07-26T01:32:50+5:302016-07-26T01:32:50+5:30
जिल्हा मजूर सहकारी संघाच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीनही पक्षांचे पदाधिकारी उतरल्यामुळे चांगलीच चुरस निर्माण झाली आहे

सत्तेसाठी फाटाफुटीचे राजकारण
गोंदिया : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीनही पक्षांचे पदाधिकारी उतरल्यामुळे चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत तीन पॅनलमध्ये लढत होत असली तरी हे पॅनल पक्षीय नाही. त्यामुळे फाटाफुटीचे राजकारण दररोज वेगवेगळे वळण घेत असल्याचे दिसून येत आहे. यात आता कोणाचा सखा होतो हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
येत्या ७ आॅगस्ट रोजी जिल्हा मजूर संघाची निवडणूक होत आहे. जिल्ह्यात ताकदवान असलेल्या या संघात पद मिळवून आपली एंट्री करण्यासाठी अनेक दिग्गज आसुसलेले आहेत. त्यामुळे आपले वर्चस्व संघावर राहण्यासाठी एकमेकांना आपल्याकडे खेचण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. संघातील १५ संचालकांच्या जागांसाठी ७९ अर्ज टाकण्यात आल्याची माहिती आहे.
सध्या संघावर भाजपची सत्ता आहे. मजूर संघाची सत्ता आपल्याकडे यावी यासाठी संघाचे आजी-माजी पदाधिकारी व विद्यमान संचालक खेळी करीत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळेच कधी सोबत बसणारे आता आमने-सामने उभे ठाकले आहेत. यामुळेच केवळ १५ जागांसाठी अनेक इच्छुकांनी अर्ज भरले आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार ७ ते ११ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारायचे होते व त्यात ८० अर्ज निबंधक कार्यालयाकडे आले. त्यातील एक अर्ज छाननीत अवैध ठरल्याने सध्या ७९ अर्ज निवडणूक रिंगणात कायम आहेत. येत्या २७ तारखेला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने किती उमेदवार रिंगणात राहतात हे त्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
२८ जुलै रोजी रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित होणार आहे. तेव्हाच किती उमेदवार रिंगणात राहतील हे स्पष्ट होणार. तत्पूर्वी अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठीही गळ घालणे सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)
- भाजपच्या आजी-माजी अध्यक्षांची वेगवेगळी चूल
मजूर संघाच्या राजकारणात पक्षीय राजकारण नसून जमेल तो आपला, हा सिद्धांत चालतो. त्यामुळे येथे पॅनल पद्धतीने निवडणूक लढली जाते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या हाती असलेल्या जिल्हा मजूर संघात यंदा सत्तेसाठी फूट पडल्याचे दिसून येत आहे.
माहितीनुसार, यंदाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष दीपक कदम आणि विद्यमान अध्यक्ष झामसिंग येरणे या भाजप पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे पॅनल उतरविले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे गप्पू गुप्ता व शिव शर्मा हे एकत्र आले असून त्यांचे तिसरे पॅनल मैदानात असल्याची माहिती आहे.
सध्याच्या ७२ सोसायट्यांमधील काही कदम यांच्यासोबत असून काही येरणे यांच्यासोबत असल्याचे बोलले जाते. नव्याने आलेल्या ३४ सोसायट्यांना घेऊन गुप्ता व शर्मा आपले पॅनल रिंगणात उतरवीत आहे. विशेष म्हणजे ३४ मधील १६ सोसायट्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशावरून मतदानाचे अधिकार मिळाले आहेत.
आणखी सात सोसायट्यांच्या अर्जावर न्यायालय निर्णय देणार आहे. त्या सात सोसायट्यांना मतदानाचे अधिकार देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यास गुप्ता व शर्मा एकत्र येवून रिंगणात उतरवित असलेल्या पॅनलचे बळ अधिक वाढणार आहे.
मतदार केंद्र नंतर ठरणार
७ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. यासाठी एक केंद्र राहणार असून अंतिम यादी प्रकाशित झाल्यानंतर मतदार केंद्र जाहीर होणार असल्याचेही सहकार विभागाकडून सांगण्यात आले.