राजकीय पक्षांना संपविण्याचा डाव
By Admin | Updated: March 20, 2016 02:13 IST2016-03-20T02:13:58+5:302016-03-20T02:13:58+5:30
सर्वच राजकीय पक्षातील लोक सध्या सरकारच्या धोरणामुळे दहशतीत आहेत.

राजकीय पक्षांना संपविण्याचा डाव
प्रकाश आंबेडकर : सरकारला पुन्हा आणायचाय मनुवाद
गोंदिया : सर्वच राजकीय पक्षातील लोक सध्या सरकारच्या धोरणामुळे दहशतीत आहेत. ज्याची चूक झाली असेल त्या नेत्याला जरूर शिक्षा द्या, पण सरकारला दुसरा कोणता पक्षच नको आहे. त्यामुळे नेत्यासोबत त्याच्या पक्षालाही दोषी ठरविण्याचा प्रयत्न करून सर्व राजकीय पक्षांना संपविण्याचा भाजप सरकारचा डाव आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.
गोंदियात शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेवर ते बोलत होते. शुक्रवारच्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावरही टीका करताना हा ‘जगलरी बजेट’ असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पातील ८२ टक्के पैसा आस्थापनेवर खर्च होत आहे. केवळ सात टक्के खर्च विकास कामांवर होत आहे. त्यामुळे पुन्हा कर्जाचा बोझा टाकला जाणार आहे. नवीन उत्पन्नाचे स्त्रोत या सरकारने निर्माण केले नसल्याचे ते म्हणाले.
राज्यपालांच्या निर्देशानुसार विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी एक हजार कोटींचा निधी मिळाला होता. पण हा निधी पूर्ण काम झालेल्या धरणांवर खर्च केल्याचे दाखविण्यात आले. या निधीचा विनियोग नियमानुसार झालाच नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री विदर्भातील असो की, पश्चिम महाराष्ट्रातील विदर्भावर अन्याय हा कायमच असल्याचे अॅड.आंबेडकर म्हणाले.
सरकारच्या धोरणांवर टीका करताना आंबेडकर म्हणाले, शासनाचं धोरण अनुदान देण्याचं आणि कोणाला मदत करण्याचे नाही. मराठवाड्यात कधी नव्हती एवढी भीषण परिस्थिती यावर्षी आहे. तरीही सरकार तेथील लोकांना दिलासा देण्यास तयार नाही. त्यामुळे आपण तेथील लोकांसाठी आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करून कंपन्यांना हाताशी धरत कॉर्पोरेट लूट करीत असल्याचे ते म्हणाले. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर दबाव टाकून त्यांना संपवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत मुख्य राजकीय शिल्लक राहतील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही परिस्थिती म्हणजे हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याचे ते म्हणाले.
अशिक्षित आणि शौचालय नसलेल्या कुटुंबांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा या सरकारचा डाव आहे. यातून नव्याने मनुवाद जन्माला येत आहे. परंतू आम्ही हे खपवून घेणार नाही. येत्या ३ एप्रिलला नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर आंबेडकरी चळवळ, मार्क्सवादी, ओबीसी संघटना यांना एकत्रित करून जाती अंताकडून राष्ट्रवादाकडे या विषयावर परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मनुवाद नको असलेल्या सर्व लोकांनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड. आंबेडकर यांनी यावेळी केले. या पत्रपरिषदेला भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खोब्रागडे, महासचिव प्रफुल भालेराव, बी.जी. डोंगरे आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)