निवडणुकांमुळे यंदाची दिवाळी ठरणार राजकीय!
By Admin | Updated: October 27, 2016 00:34 IST2016-10-27T00:34:22+5:302016-10-27T00:34:22+5:30
गोंदिया जिल्ह्यातील दोन आणि भंडारा जिल्ह्यातील चार नगर पालिकांचे अध्यक्ष व नगरसेवकांच्या

निवडणुकांमुळे यंदाची दिवाळी ठरणार राजकीय!
होर्डिंग्जविना शहर स्वच्छ : शुभेच्छांचे फलकही हटले
गोंदिया/भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील दोन आणि भंडारा जिल्ह्यातील चार नगर पालिकांचे अध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला वेग आला आहे. या निवडणुकीची सुरूवात दिवाळीपूर्वीच होणार असल्याने यंदाची दिवाळी इच्छुक उमेदवारांसाठी राजकीय ठरणार आहे. परंतु या निवडणुकीत कुणाला फटाके लागतात, हे येणारा काळच ठरविणार आहे.
दिवाळी हा सर्वांसाठी महत्त्वाचा सण असला तरी राजकीय नेतेमंडळीसाठी होर्डिग्ज, बॅनर्स, पोस्टर्स लावून शुभेच्छा देण्यासाठी पर्वणीचा काळ असतो. परंतु विधान परिषद निवडणुकीची भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता नेतेमंडळींना होर्डीग्जवर शुभेच्छा देता येणार नाही. शुभेच्छा देण्यासाठी स्रेहमिलन कार्यक्रम करावे लागणार आहे. याशिवाय मतदारांच्या व्यक्तीगत भेटी घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे होर्डिग्जच्या माध्मातून कोरड्या शुभेच्छांनी यावर्षी भागणारे नसल्याचे चित्र आहे.
भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी या तीन नगर पालिकांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे तर साकोली नगरपालिका नव्याने अस्तित्वात आली आहे. या चारही नगरपालिकेत अध्यक्ष, नगरसेवकांच्या पदासाठी १८ डिसेंबर रोजी होणार आहे. १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने आता निवडणुकीच्या घडामोडींना व वेगवेगळ्या नावाच्या चर्चेला उधाण येणार आहे.
निवडणुकीची तारीख घोषित होण्यापूर्वी काही इच्छुक उमेदवार कामाला लागले होते. त्यादृष्टीने मोर्चेबांधणीला सुरूवात केली. निवडणुकीमुळे नगर पालिकेच्या हद्दीतील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. १९ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार सर्व प्रक्रिया आटोपल्यानंतर नगर पालिकेच्या प्रचारात रंगत येणार आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. यामुळे कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येतील. नामनिर्देशनसाठी संगणक प्रणाली पालिका निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीनुसार व नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून होईल. ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवाराला उमेदवारी अर्ज व शपथपत्र सहज भरता यावे, यासाठी एक संगणक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
शिवसेना, मनसे उतरणार आखाड्यात?
१९ नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज घेणे सुरू झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना उमेदवार लढविणार आहे. दरम्यान, याबाबत मुंबईत शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बुधवारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नामांकन अर्ज घेण्यात येणार आहे. हे दोन्ही उमेदवार अन्य जिल्ह्यातील असून आयात करण्यात येणार आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा तेवढी शिल्लक आहे.