पोलिओ लसीकरणाची तयारी जोरात
By Admin | Updated: January 5, 2017 00:49 IST2017-01-05T00:49:10+5:302017-01-05T00:49:10+5:30
पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओ लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

पोलिओ लसीकरणाची तयारी जोरात
गोंदिया : पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओ लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही वयोगटातील बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी काळे यांनी केले.
२९ जानेवारी व २ एप्रिल २०१७ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ९४५ बालकांना पोलिओचा डोज देण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील ८६ हजार २०३ आणि शहरी भागातील १८ हजार ७४२ बालकांचा समावेश आहे. वरील दिवशी बुथवरील लसीकरणानंतर ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस गृहभेटीतून लसीकरणातून सुटलेल्या बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येणार आहे. स्थलांतरीत व प्रवास करणारे बालकेही लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी बसस्थानके, रेल्वेस्टेशन, टोलनाके व विमानतळ परिसरात या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात २९० पथके यासाठी काम करणार आहेत. सन १९९४-९५ पासून राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)