पोलीस कल्याण निधी दोन वर्षांपासून वांझोटा
By Admin | Updated: November 6, 2014 22:56 IST2014-11-06T22:56:48+5:302014-11-06T22:56:48+5:30
तीन-चार वर्षापूर्वी कोटीच्या घरात असलेला पोलीस कल्याण निधीत फक्त ५० लाखावर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात राबणाऱ्या पोलिसांसाठी विशेष योजना पोलीस विभाग राबवित नसल्याची खंत

पोलीस कल्याण निधी दोन वर्षांपासून वांझोटा
गोंदिया : तीन-चार वर्षापूर्वी कोटीच्या घरात असलेला पोलीस कल्याण निधीत फक्त ५० लाखावर येऊन ठेपला आहे. जिल्ह्यात राबणाऱ्या पोलिसांसाठी विशेष योजना पोलीस विभाग राबवित नसल्याची खंत पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन वर्षात कल्याण निधीत भर घालण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नसल्याने हा निधी वांझोटा ठरला आहे.
गोंदिया जिल्ह्यात २ हजारांपेक्षा अधिक पोलीस कार्यरत आहेत. २४ तास सेवा देऊन नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांना त्यांच्याच विभागाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नाही. पोलिसांच्या कल्याणासाठी असलेला जिल्ह्याचा निधी दिवसेंदिवस खुंटत चालला आहे. आजघडीला जिल्ह्याच्या पोलीस कल्याण निधीत फक्त ५० लाख रुपये असल्यामुळे पोलिसांसाठी राबविण्यात येईल अशी नवीन संकल्पना सुरू करण्याजोगा पैसाच उपलब्ध नसल्याचे समजते.
चार वर्षांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुवेझ हक यांनी संगीत रजनीचे आयोजन करून कोटीच्या घरात निधी जमा केला होता. त्यानंतर साईबाबावर आधारित नाट्य प्रयोगाचे आयोजन करून दीड कोटीच्या घरात पोलीस कल्याण निधी जमा केला होता. परंतु त्यानंतर पोलीस कल्याण निधी वाढविण्यासाठी कोणीच प्रयत्न न केल्यामुळे पोलीस कल्याण निधीत फक्त ५० लाख रुपये उरले आहेत. यातूनच प्रत्येक महिन्याला पोलिसांसाठी कॅटीनमध्ये साहित्य आणावे लागते.
महिन्याकाठी १६ ते १७ लाख रुपये किंमतीचे साहित्य आणावे लागते. या कल्याण निधीतून पोलिसांसाठी असलेल्या वाचनालयावरील खर्च केला जातो. याचा लाभ १०० कर्मचारी-अधिकारी लाभ घेतात. व्यायाम शाळा याच निधीतून चालविण्यात येते. याचा लाभ २०० अधिकारी-कर्मचारी घेतात. जिल्हा क्रीडा स्पर्धा, पोलीस कुटूंब आरोग्य योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाअंतर्गत बी.ए., एम.बी.ए. अभ्यासक्रम चालविण्यात येतात. सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार याच निधीतून खर्च केला जातो. आरोग्य शिबिराचे आयोजनही केले जाते.
यावर्षी पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या मुलांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले नव्हते. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही झाला नाही. फटाके विक्री केली जाते. तसेच इतर विविध कामे या पोलीस कल्याण निधीतून केली जातात. दोन वर्षापासून पोलीस कल्याण निधीसाठी एकाही कार्यक्रमाचे आयोजन न झाल्यामुळे पोलीस कल्याण निधी खुंटत चालला आहे. आणखी काही दिवसात आहे तो निधीही संपून जाईल. त्यामुळे सुरू केलेले उपक्रम नियमितपणे चालावे यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद कुठून करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. (तालुका प्रतिनिधी)