पोलीस विभागाला महिनाभरापासून मुहूर्त सापडेना
By Admin | Updated: November 30, 2014 23:08 IST2014-11-30T23:08:20+5:302014-11-30T23:08:20+5:30
तंटामुक्तीवर लिखाण करणाऱ्या बातमीदारांना दरवर्षी शासनातर्फे पुरस्काराची घोषणा केली जाते. सन २०१२-१३ या वर्षातील पुरस्काराची घोषणा शासनाने केली. मात्र तो पुरस्कार अद्याप

पोलीस विभागाला महिनाभरापासून मुहूर्त सापडेना
गोंदिया : तंटामुक्तीवर लिखाण करणाऱ्या बातमीदारांना दरवर्षी शासनातर्फे पुरस्काराची घोषणा केली जाते. सन २०१२-१३ या वर्षातील पुरस्काराची घोषणा शासनाने केली. मात्र तो पुरस्कार अद्याप सबंधीत बातमीदाराांं देण्यात आला नाही. गोंदिया पोलीस अधिक्षक कार्यालयातर्फे २९ आॅक्टोबर रोजी पुरस्काराचे धनादेश तयार केले. परंतु या पोलीस विभागाला धनादेश वाटपाचा मुहूर्त सापडेना ही म्हणण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र शासनाने १५ आॅगस्ट २००७ रोजी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणली. या मोहीमेमुळे गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. या मोहीमेमुळे गावात शांतता व समृध्दता नांदेल ही अपेक्षा होती. या मोहीमेचा फायदा राज्यभरात झाला. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले लाखो तंटे आपसी समन्वयातून सुटले. या मोहिमेला लोकचळवळ प्राप्त व्हावी, पुन्हा उद्भवणारे वाद गंभीर गुन्ह्यात परावर्तीत होऊ नये यासाठी प्रचार प्रसिध्दी करणाऱ्या बातमीदारांंना पुरस्कार देण्याचे शासनाने ठरविले. जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर प्रथम, व्दितीय व तृतीय बक्षीस देण्यात येते.
राज्यातील बातमीदारांना दरवर्षी शासनातर्फे बक्षीस जाहीर केले जाते. सन २०१२-१३ या वर्षात प्रचारप्रसिध्दी करणाऱ्या ५५ बातमीदारांना ३० आॅगस्ट २०१४ पुरस्कार घोषीत करण्यात आले. या ५५ बातमीदारांना २५ लाख ३५ हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले. बक्षीस जाहिर झाला तेव्हापासून तीन महिन्याचा कालावधी लोटला मात्र बातमीदारांना बक्षीस मिळाले नाही.गृहविभागाने बातमीदारांना पुरस्कारासाठी रक्कम सबंधीत जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांकडे वळती केली.
गोंदिया जिल्ह्यातील तीन बातमीदारांचे ५० हजार रुपये पोलीस अधिक्षकांच्या खात्यात वळती केले. कोषागार कार्यालयाकडून २९ आॅक्टोबरला धनादेश तयार करण्यात आले. मात्र हे धनादेश महिनाभरापासून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात पडून आहेत. हे धनादेश वाटप करण्यासाठी पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना हे पत्रकार दिनाची वाट पाहात होते. १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन आला व निघूनही गेला. मात्र ते धनादेश वाटप झाले नाही.
पोलीस अधीक्षक मिना यांनी हे धनादेश वाटप करण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांकडे सोपविल्याचे समजते. परंतु महिना होऊनही धनादेश वाटप केलेच नाही. धनादेश तयार आहेत मात्र बक्षीस वितरणाचा मुहूर्त गोंदिया पोलीस विभागाला सापडत नसल्याचे चित्र उभे आहे.
(तालुका प्रतिनिधी)